चांद्रयान-3 च्या लँडिंगनंतर प्रकाश राज यांची नवी पोस्ट! पुन्हा झाले ट्रोल; लोक म्हणाले, 'आता रात्रभर...'

Prakash Raj On Chandrayaan-3 Successful Landing On Moon: प्रकाश राज यांनी काही दिवसांपासूर्वी चांद्रयान-3 संदर्भात केलेल्या एका पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. या अभिनेत्यावर चहुबाजूंनी टिका झाली होती. असं असतानाच आता मोहिम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी नवी पोस्ट केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 24, 2023, 08:55 AM IST
चांद्रयान-3 च्या लँडिंगनंतर प्रकाश राज यांची नवी पोस्ट! पुन्हा झाले ट्रोल; लोक म्हणाले, 'आता रात्रभर...' title=
प्रकाश राज यांच्या नव्या ट्वीटवरुनही त्यांना केलं जातंय लक्ष्य

Prakash Raj On Chandrayaan-3 Successful Landing On Moon: चांद्रयान-3 संदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे टीकेचे धनी ठरलेले अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयान-3 मोहिमेतील लँडर यशस्वीपणे चंद्रावर उतरल्यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वीच या मोहिमेवरुन खोचक विधान करणाऱ्या प्रकाश राज यांनी बुधवारी भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी ठरल्याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रकाश राज यांनी सोमवारी ट्वीटवर केलेल्या एका पोस्टमुळे टीकेचा भडीमार सहन करावाला लागला होता. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना चांद्रयान-3 मोहिमेची खिल्ली उडवल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली जात होती. या टीकेनंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना, "द्वेषच द्वेष वाढवण्यासाठी कारणीभूत असतो" असं म्हणत प्रकरण निकाली काढलं होतं. आता चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर त्यांनी नवं ट्वीट केलं आहे.

काय म्हटलं आहे प्रकाश राज यांनी?

आपल्या नव्या ट्वीटमध्ये 58 वर्षीय अभिनेत्याने चंद्रावरील अज्ञात दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 ने यशस्वी लँडिंग करणं हे मानवासाठी उत्सवाचा क्षण आहे असं म्हटलं आहे. "भारत आणि मानवजातीसाठी अभिमानाचा क्षण" असं म्हणत हात जोडल्याचे इमोजी प्रकाश राज यांनी आपल्या ट्वीटच्या पहिल्या ओळीत म्हटलं आहे. "इस्रोचे, चांद्रायन-3 चे, विक्रम लँडरचे आणि हे घडवून आणण्यात हातभार लावलेल्या प्रत्येकाचे आभार. या माध्यमातून आपल्याला विश्वाच्या पसाऱ्याचं रहस्य उलडगण्याच्या नव्या संधी उपलब्ध होवोत," असं प्रकाश राज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अनेकांनी उडवली खिल्ली

मात्र या ट्वीटवर अनेकांनी प्रकाश राज यांना तुम्ही आधीच या मोहिमेबद्दल नको त्या शब्दांमध्ये बोलल्याची आठवण करुन दिली आहे. तुम्ही आधीच फार नुकसान केलं आहे. आता गोड बोलण्याचा प्रयत्न करु नका, असा सल्ला एकाने प्रकाश राज यांना दिला आहे. एका मिम्सच्या अकाऊंटवरुन प्रकाश राज यांचा वॉण्डेट चित्रपटामधील एक मिम पोस्ट करताना मजेदार पद्धतीने टीका करण्यात आली आहे. "आज रात्री प्रकाश राज झोपणार नाहीत," असा टोला या मिममधून लगावण्यात आला आहे.

पोस्टमुळे निर्माण झालेला वाद

प्रकाश राज हे सध्याच्या सत्ताधारी पक्षाविरोधात अनेकदा सोशल मीडियावरुन व्यक्त होत असता. अशाच एका पोस्टमध्ये त्यांनी चहा एका कपमधून दुसऱ्या कपमध्ये ओततानाचं कार्टून शेअर करत चांद्रयान-3 ने पाठवलेला पहिला फोटो म्हणत एक पोस्ट केलेली ज्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.