नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत तुम्ही मनापासून काम केले नाहीत, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फैलावर घेतले. त्या बुधवारी रायबरेली मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी रायबरेली मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांशी स्वतंत्ररित्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटले की, मी याठिकाणी भाषण देण्यासाठी नव्हे तर समीक्षा करण्यासाठी आले आहे. यंदा रायबरेलीच्या निवडणुकीत तुम्ही काँग्रेसच्या पाठिशी उभे राहिलात. मात्र, सोनिया गांधी यांचा विजय केवळ जनतेमुळे झाला. या निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले नाही, असे प्रियंका यांनी म्हटले.
ही गोष्ट तुम्हाला कटू वाटेल. मात्र, लोकसभा निवडणुकीत कोणी मनापासून काम केले आणि कोणी नाही, याची जाणीव तुम्हाला स्वत:ला आहे. मी या सगळ्याची माहिती घेईनच. मात्र, निवडणुका या नेहमी संघटनेच्या बळावरच लढवल्या जातात, हे मी तुम्हाला वारंवार सांगत आले आहे. त्यामुळे काही गोष्टी मनाशी पक्क्या करून सर्वस्व झोकून काम करा. आपल्याला संघर्ष करावाच लागेल, असे प्रियंका यांनी सांगितले.
यावेळी प्रियंका यांनी उत्तर प्रदेशातील २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकांविषयीही चर्चा केली. या निवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. तसेच उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या १२ जागांवर लवकरच पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी काँग्रेसने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच प्रियंका गांधी यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपावण्यात आली होती. प्रियंका सक्रिय झाल्याने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत फायदा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा सपशेल फोल ठरल्या.