नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी लोकसभेत राफेल कराराबाबत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर केलेले आरोप फ्रान्स सरकारने फेटाळून लावले आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे राफेलचा करार गोपनीय ठेवण्यात आल्याचा खुलासा फ्रान्स सरकारने केला आहे. कराराबाबत २००८मध्ये जे निकष होते तेच २०१६ला लागू करण्यात आल्याचे स्पष्टीकरणही फ्रान्सने दिले आहे. त्यामुळे आता राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी राफेल खरेदी व्यवहाराबाबत केलेल्या आरोपांनंतर भाजप खासदारांनी संसदेत प्रचंड गोंधळ घातला. या विमानांच्या वाढलेल्या किंमतीबाबत सरकारला प्रश्न विचारायला गेल्यास सरकारकडून भारत आणि फ्रान्स यांच्यातील गोपनीयता कराराचे कारण दिले जाते. मात्र, मी स्वत: जाऊन फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी दोन्ही देशांमध्ये असा कोणताही करार झालाच नसल्याचे म्हटले. याचा अर्थ संरक्षणमंत्री निर्मला सितारामन देशवासीयांची दिशाभूल करत आहेत, असे राहुल यांनी म्हटले. यासाठी त्यांच्यावर पंतप्रधान मोदींकडून दबाव आणला गेला, असा आरोपही राहुल यांनी केला होता. हे आरोप निराधार असल्याचे सांगत भाजपने राहुल गांधींविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सांगितले.