Confirm Train Ticket: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा झाला तर आधी कन्फर्म तिकिट असणं महत्त्वाचे असते. नाहीतर मग तात्काळमध्ये तिकिट काढणे हे काम खूप वेळखाऊ असते. अशातच तिकिटांची वेटिंग लिस्ट आणि त्या लिस्टमध्ये नाव असेलच याचीही काही शाश्वती नाही. मात्र आता वेटिंग लिस्टची ही कटकट लवकरच संपणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच वर्षांत रेल्वेने प्रवास करण्यासाठी कोणत्याही प्रवाशाला लगेचच कन्फर्म तिकिट मिळणार आहे. ही नरेंद्र मोदींची गँरटी आहे. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी रेल्वेमध्ये अभूतपूर्व असे परिवर्तन केले आहे. येत्या पाच वर्षांत पंतप्रधान मोदींची गँरटी आहे की, रेल्वेची क्षमता इतकी वाढवली जाईल की जवळपास प्रत्येक प्रवाशाला सहजपणे कन्फर्म तिकिट मिळेल, असा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला आहे.
गेल्या दहा वर्षात भारतील रेल्वेचा कसा कायापालट झाला याचे एक उदाहरण देखील केंद्रीय मंत्र्यांनी दिलं आहे. रेल्वे रुळांचे काम करण्याच्या प्रक्रियेत 2004 ते 2014च्या दरम्यान जवळपास 17,000 किमीपर्यंत रूळ बनवण्यात आले आहेत. 2014 ते 2024 पर्यंत 31,000 किलोमीटर पर्यंत नवीन ट्रॅक बनवण्यात आले. 2004 ते 2014पर्यंत म्हणजेच 10 वर्षांत जवळपास 5 हजार किमी रेल्वे रूळांचे विद्युतीकरण करण्यात आले. तर, मागील दहा वर्षात 44,000 किमीपर्यंत रेल्वे रूळांचे विद्युतीकरण झाले आहे.
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2004 ते 2014 पर्यंत फक्त 32,000 कोचच तयार करण्यात आले. गेल्या 10 वर्षांत 54,000 कोच बनवण्यात आले. 2014 पूर्वी मालवाहतुकीसाठी कॉरिडॉरचा एकही किलोमीटर कार्यान्वित करण्यात आला नव्हता. आता, 2,734 किमीचे दोन समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर कार्यान्वित झाले आहेत.
येत्या 5 वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी रेल्वेला अधिक मजबूत केले जाणार आहे. जेणेकरुन प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायक होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे.