Crime News : सख्खा भाऊ पक्का वैरी या म्हणीप्रमाणे मोठ्या भावाने आपल्या लहान भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील चतरखुंटा गावातील ही घटना आहे.
नेमकं काय घडलं?
लहान भाऊ विकेश हा शेती करून घर चालवत होता. मात्र आरोपी मोठा भाऊ अर्जुन हा ग्रॅज्युट होता पण त्याला कुठेही नोकरी मिळत नव्हती. सुशिक्षित असल्याने तो शेतातही काम करत नसायचा. यावरून दोन्ही भावांमध्ये वारंवार भांडणे होत होती.
गुरूवारी रात्री 10 वाजता विकेश झोपला होता त्यावेळी आरोपी त्या घराची कौल काढून आतमध्ये शिरला. झोपेत असलेल्या विकेशवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विकेशचा जाग्यावरच मृत्यु झाला. मोठा आवाज ऐकून विकेशची पत्नी घरात आली. पत्नीने आरडाओरडा केल्यावर सर्व घरातील लोक जमा झाले. तेव्हा अर्जुनने तिथून पळ काढला.
विकेशला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र त्याला डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केलं. या घटनेच्या चार दिवस आधी आरोपी अर्जुनने मृत विकेशच्या पत्नीलाही मारहाण केली होती. विकेशच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात आपल्या मोठ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अर्जुन हत्या करून फरार झाला असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.