नवी दिल्ली : राजधानी एक्स्प्रेसमधील फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी दिली आहे. कारण जर राजधानी एक्स्प्रेसमधील फर्स्ट आणि सेकंड एसी कोचचं तिकीट कन्फर्म नसेल, तर त्या प्रवाशांना विमान सेवेचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे.
मात्र प्रवाशाला रेल्वे तिकिटाचे पैसे वजा करून विमान तिकिटाचे पैसे द्यावे लागणार आहेत.
ही कल्पना एअर इंडियाचे माजी संचालक अश्विनी लोहानी यांची आहे, यापूर्वी देखील लोहानी यांनी, याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला दिला होता.
रेल्वे मंत्रालयाकडून याबाबतीत अजून प्रतिसाद मिळालेला नाही. पण सध्या अश्विनी यांच्याकडेच रेल्वे मंत्रालयाचं संचालकपदी आहेत. त्यामुळे एअर इंडियाकडून असा प्रस्ताव पुन्हा सादर झाल्यास, त्याला तात्काळ मंजुरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच राजधानी एक्स्प्रेसमधील फर्स्ट क्लास एसीचा तिकीट दर आणि विमानाचा तिकीट दरात जास्त फरक नाही. अशा प्रकारच्या प्रस्तावामुळे प्रवाशांना आपल्या इच्छित ठिकाणी लवकरात लवकर पोहोचणं शक्य होणार आहे.
एअर इंडियाकडून असा प्रस्ताव पुन्हा रेल्वे मंत्रालयाला देण्यात येईल की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कारण, एअर इंडियाचा खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरु आहेत.