मुंबईः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील 14 बँकांना कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदाचेही (BOB) नाव आहे. विविध मार्गदर्शक सूचना आणि तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बंधन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट सुईस एजी, इंडियन बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक, करुड वैश्य बँक, पंजाब आणि सिंध बँक, साऊथ इंडियन बँक, जम्मू-काश्मीर बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेला प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या बँकेला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर बँक ऑफ बडोदाला जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
रिझर्व्ह बॅंकेने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कंपन्यांच्या एका गटाच्या खात्याच्या छाननी दरम्यान काही विशिष्ट तरतुदींचे पालन करण्यास बँका अपयशी ठरल्याची बाब समोर आली. यामध्ये कर्जे, नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना वैधानिक आणि इतर निर्बंध आणि सर्व बँकांमध्ये मोठ्या सामान्य प्रदर्शनासाठी केंद्रीय भांडार तयार करण्याच्या तरतुदींचा समावेश आहे. यासंदर्भात बँकांना नोटीसही बजावण्यात आली. परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला. या सर्व बँकांवर 50 लाख रुपयांपासून 2 कोटी रुपयांपर्यंत दंड लावण्यात आला आहे.