नवी दिल्ली : आम्ही घेतलेल्या निर्णयांची राजकीय किंमत चुकवावी लागेल. यासाठी आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
नोटबंदी आणि जीएसटीवरून मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयाची राजकीय किंमत आम्हाला चुकवावी लागेल याची मला पूर्ण कल्पना आहे, असं मोदी दिल्लीत झालेल्या हिंदूस्थान टाईम्स लिडरशीप समिटमध्ये म्हणाले.
नोटबंदी आणि जीएसटीमुळे लाखो लोकांना त्रास सहन करावा लागला, असा आरोप विरोधकांनी माझ्यावर केला. पण सिस्टीममध्ये बदल सहज करता येत नाहीत. सिस्टीमच बदलण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली.
नोटबंदीआधी काळा पैसा समांतर अर्थव्यवस्थेमध्ये होता तो अर्थव्यवस्थेमध्ये आला. नोटबंदीनंतर काळा पैसेवाल्यांची माहिती मिळाल्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यास मदत झाल्याचं मोदी म्हणाले.
आम्ही केलेल्या प्रयत्नांमुळेच इज ऑफ डुइिंग बिजनेसमध्ये भारत १४२व्या क्रमांकावरून १००व्या क्रमांकावर आला, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला २०१४मध्ये नागरिकांनी बदल हवा म्हणून मतदान केलं. तेव्हापासून आम्ही सिस्टिममध्ये सकारात्मक बदल केले. सिस्टीम बदलण्यासाठी कोणाला तरी दिवस-रात्र मेहनत करावी लागणार आहे, यासाठी मी लढत असल्याचं वक्तव्य मोदींनी केलं.