मुंबई : भारतीय हवामान खात्याने केरळसह 7 राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत पाऊस येणं अपेक्षित असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने केरळमधील 6 जिल्ह्यांमध्ये इडुक्की, त्रिशूर, कोझिकोड, कन्नूर, कासारगोड आणि एर्नाकुलममध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल होत असल्याची माहिती मिळाली आहे. तामिळनाडू आणि केरळच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
एकाठिकाणी उत्तर भारतात सर्दी वाढण्यास सुरुवात झाली तर दुसरीकडे दक्षिण भारतात पावसाचा जोर दिसून येतोय. हवामान विभागाच्या म्हणण्याप्रमाणे, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, पुद्दुचेरी, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गोव्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ही परिस्थिती मच्छिमारांसाठी कठीण होऊ शकते. त्यामुळे या काळात समुद्रात मासेमारीला न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय केरळच्या पेरियार नदीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पठाणमथिट्टा याठिकाणीही मुसळधार पावसामुळे प्रशासन सतर्क आहे.
याशिवाय, आयएमडीने गुरुवारी चेन्नई आणि तमिळनाडूमधील तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू या जवळच्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.