नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे झालेली मुंबईकरांची दैना उभ्या महाराष्ट्राने दोन दिवसांपूर्वीच पाहिली. पण, केवळ मुंबईतच नव्हे तर, संपूर्ण देशात मुसळधार पावसाने थैमान घातल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीमुळे देशात तब्बल ९३७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आदी राज्यांमध्ये पाऊस तांडव करत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबईत झालेल्या पावसामुळे १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबई, पालघर आणि ठाण्यातील नागरिकांचा समावेश आहे. तर, घाटकोपरमध्ये इमारत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, बिहारमध्ये आलेल्या महापूरात तब्बल ५१४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक लोक बेघर झाले आहेत.
उत्तर प्रदेशमध्येही महापूराचा मोठा फटका बसला असून, तेथे १०३ नागरिकांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील महापुराचा तब्बल २७ लाख लोकांना फटका बसला. पश्चिम बंगालमध्येही महापूरामुळे १५२ जणांना आपला प्राण गमवावे लागला. तर, आसाममध्येही १५८ जणांचा महापुरामुळेच मृत्यू झाला.
देशातील विविध राज्यांमध्ये महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमध्ये राज्यात पडलेल्या पावसापेक्षा नेपाळमधील नदिला आलेल्या महापूराचाच अधिक फटका बसला आहे.