राहुल गांधींनी भारत-चीन संघर्षावर गलिच्छ राजकारण करणे सोडावे- अमित शहा

अमित शहांनी ट्विट केला जखमी भारतीय जवानाच्या वडिलांचा व्हीडिओ

Updated: Jun 20, 2020, 04:55 PM IST
राहुल गांधींनी भारत-चीन संघर्षावर गलिच्छ राजकारण करणे सोडावे- अमित शहा title=

नवी दिल्ली: भारत-चीन यांच्यातील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर संपूर्ण देश एकटवला आहे. अशावेळी राहुल गांधी यांनी गलिच्छ राजकारणाची कास सोडली पाहिजे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर गलवान खोऱ्यात चीनशी लढताना जखमी झालेल्या भारतीय जवानाच्या वडिलांचा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत जवानाच्या वडिलांनी भारत-चीन संघर्षात राहुल गांधी यांनी राजकारण करु नये, अशी टीका केली आहे. भारतीय सैन्य चीनला हरवण्यासाठी सक्षम आहे. माझा मुलगा यानंतरही देशासाठी लढेल, असे या जवानाच्या वडिलांनी व्हिडिओत म्हटले आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

राहुल गांधी भारतीय सैन्याचे मनोबल खच्ची करतायत; भाजपची घणाघाती टीका

त्यामुळे अमित शहा यांनी या व्हीडिओचा वापर करत राहुल गांधी यांना लक्ष्य केले. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. गलवान खोऱ्यात धोका असतानाही भारतीय सैनिकांना निशस्त्र का पाठवण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच गलवान खोऱ्यातील चीनचा हल्ला हा पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही केंद्र सरकार कठोर पावले का उचलत नाही, असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते. 

गलवान खोऱ्यातील परिस्थितीविषयी शरद पवारांचा मोदी सरकारला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले...

आज सकाळीच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पंतप्रधान मोदींनी गलवान खोऱ्याचा प्रदेश चीनच्या ताब्यात जाऊन दिला. जर हा भूभाग चीनचाच होता तर मग आपले सैनिक कसे मारले गेले? आपले सैनिक नक्की कोणत्या जागी शहीद झाले, असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.