नवी दिल्ली : संघाचे नेते आणि राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे निमंत्रक इंद्रेश कुमार यांनी हमीद अन्सारींना सुनावलं आहे. इंद्रेश कुमार म्हणाले, 'अन्सारी जे काही बोलले, ते भारतातल्या मुस्लिमांनाही पटलेलं नाही. त्यामुळं अन्सारींना जिथं सुरक्षित वाटतं, त्या देशात जाण्यासाठी ते मोकळे आहेत,' अशा शब्दांत माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं टीकेची तोफ डागली आहे.
'अन्सारी यांनी भारतात राहून त्रास सहन करावा, असं आम्हालाही वाटत नाही. जगातील कोणत्या देशात मुस्लिम सुरक्षित आहेत ते त्यांनी सांगावं आणि तिकडं जावं,' असंही इंद्रेश कुमार यांनी सुनावलं. राष्ट्रीय मुस्लिम मंचानं आयोजित केलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात देशातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळं देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यावरून इंद्रेश कुमार यांनी अन्सारींचा समाचार घेतला.