Loksabha Attack: 'त्यांच्यादृष्टीने ही क्रांती, तरुणांनी व्यक्त केलेल्या भावना देशाच्या', असं का म्हणाले राऊत?

Sanjay Raut On Loksabha Attack: संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली गेली.  संसदेचा 22 वर्षांपुर्वीचा हल्लाही असाच घडल्याची आठवण राऊतांनी करुन दिली. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 14, 2023, 12:08 PM IST
Loksabha Attack: 'त्यांच्यादृष्टीने ही क्रांती, तरुणांनी व्यक्त केलेल्या भावना देशाच्या', असं का म्हणाले राऊत? title=

Sanjay Raut On Loksabha Attack:  संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली गेली. संसदेत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि स्मोककँडलमधून (Smoke Candle) धुर पसरवला. या दोघांनी खासदारांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधिन केलं. त्याचवेळी बाहेर एक तरुण-एका तरुणीने निदर्शनं केली त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 
 
या देशात सुरक्षेच्या नावाने बोंब आहे. काल लोकसभेत आपण पाहिले. आता सरकार चिंतन, निवडणुकांचे प्रचार, मुख्यमंत्र्याच्या नियुक्त्या आणि विरोधकांवर हल्ले करण्यात व्यस्त आहे. सरकार तकलादू पायावर उभे आहे, हे लोकांना कळले असले. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी का घुसले, म्यानमारचे अतिरेकी मणिपूरमध्ये कसे घुसले?, चीन हे अरुणाचल आणि लडाखमध्ये कसे घुसलेय हे जनतेला कळेल. सरकार केवळ भावनिक राजकारण करत असल्याची टीका राऊतांनी केली.

काल लोकसभेत तरुण घुसले.  मी त्यांना दहशतवादी म्हणत नाही.  त्यांनी गॅलरीतून खाली उड्या मारल्या. त्यांनी स्मोक कांड्या फोडल्या. कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था भेदून कोणीही,कुठेही घुसू शकेल ही देशाची स्थिती आहे. कारगीलही असंच घडलं. संसदेचा 22 वर्षांपुर्वीचा हल्लाही असाच घडल्याची आठवण राऊतांनी करुन दिली. 

आज ज्या तरुणांना पकडले आहे, त्यांचा मार्ग चुकला. तरुणांच्या भावना व्यक्त करत होते. त्या देशाच्या भावना आहेत. महागाई, बेरोजगारी, अस्थिरता अस्वस्थता, याबद्दल त्यांच्या घोषणा सुरु होत्या. हे तरुण बेरोजगार आहे. त्यांना पकोडे तळण्याचीही जागा नाही. तसेच  यातील एक तरुण पीएचडी करत आहे, तिला अजित पवारांनी मार्गदर्शन करायला हवे, असा टोला राऊतांनी पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्र्यांना यावेळी लगावला. 

देशातील तरुण वैफल्यग्रस्त होऊन हल्ला करत असतील तर देशातील अराजकतेची सुरुवात असल्याचे राऊत म्हणाले.  त्यांच्यादृष्टीने ही क्रांती आहे. आमच्यादृष्टीने ही अतिरेक आहे. हा चुकीचा मार्ग आहे. या देशातील सुशिक्षित तरुणांना दिशा देण्याचे काम करायला हवे. मोदी सरकारच्या योजना फेल आहे. आमच कोणालाही समर्थन नसल्याचे राऊतांनी स्पष्ट केले आहे. 

आरोपींपैकी एक महाराष्ट्रातला

धक्कादायक म्हणजे लोकसभेच्या बाहेरही एक तरुण आणि एका तरुणीने घोषणाबाजी केली. दोघांनाही अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव अमोल शिंदे असं आहे. अमोल शिंदे 25 वर्षांचा असून तो महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे. अटक करण्यात आलेल्या मुलीचं नाव निलम असं आहे ही हिसारमधली राहाणारी असून तीचं वय 42 आहे.