नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती करण्याची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र, प्रत्यक्षात महात्मा गांधींचा वारसा लाभलेल्या गोष्टींकडे सरकारचे किती दुर्लक्ष होत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात गुजरातच्या अहमदाबाद येथे महात्मा गांधींनी स्थापन केलेली शाळा निधीअभावी बंद पडायची वेळ आली आहे.
महात्मा गांधींनी प्रसिद्ध गुजरात विद्यापीठासह १९२१ साली अहमदाबादमध्ये राष्ट्रीय शाळेची स्थापना केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून ही शाळा बंद पडली आहे. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या पहिली ते सातवीतल्या विद्यार्थ्यांनी नाईलाजाने दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात ३७ विद्यार्थी उरले होते. या शाळेपासून काही अंतरावर असलेल्या प्रसिद्ध अल्फ्रेड हायस्कुलचेही वस्तुसंग्रहालयात रुपांतर करण्यात आले आहे. येत्या ३० तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.
१ फेब्रुवारी १९२१ रोजी राष्ट्रीय शाळा सुरु झाली होती. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे देण्याचा गांधीजींचा उद्देश होता. अनेकदा गांधीजींनी या शाळेत प्रार्थनाही म्हटली आहे. १९३९ साली झालेल्या आंदोलनावेळी गांधींजींनी याठिकाणी उपोषणही केले होते. त्याकाळी शहरातील उत्तम शाळांमध्ये राष्ट्रीय शाळेची गणना व्हायची. मात्र, आता सरकारच्या दुर्लक्षामुळे ही शाळा बंद पडली आहे.