Jyoti Maurya Case: ज्योती आणि अलोक मौर्य प्रकरण सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेशची एसडीएम ज्योतीवर तिच्या पतीने अनेक गंभीर आरोप केले आहेत. अलोकच्या आरोपांनुसार त्याने स्वकमाईने तिला शिकवले, तिच्या कोचिंग क्लासची फी भरली. मात्र ती अधिकारी होताच तिने फसवले. अलोकच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर ज्योती मौर्यविरोधात अनेकांनी टीका केली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ज्योतीने पहिल्यांदाच सर्व आरोपांवर उत्तर दिले आहे.
ज्योतीचे विवाहबाह्य संबंध असून तिच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप अलोकने केला होता. यासगळ्यावर आता ज्योती मौर्य यांनी उत्तर दिलं आहे. आजतकला त्यांनी एक मुलाखत दिली आहे. आमच्या नात्यात गेल्याकाही दिवसांपासून तणाव आहे. माझ्या पतीसोबतच्या नात्यात खूप अडचणी आहेत. मी याआधीच घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मी कायदेशीररित्या घटस्फोटासाठी लढत आहे. याव्यतिरिक्त माझे कुठेच काही नाहीये, असं स्पष्टीकरण ज्योती मौर्य यांनी दिलं आहे.
अलोक मौर्य यांनी व्हायरल केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटबाबतही ज्योती यांनी गंभीर दाखल घेतली आहे. माझ्या पतीने व्हायरल केलेल्या चॅटविरोधात मी आधीच IT Act अंतर्गंत तक्रार दाखल केली आहे. ही केस मे महिन्यातील असून त्याविरोधात पोलिस पुरावे गोळा करत आहेत.
अलोक मौर्य यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यावर ज्योती यांनी हा तपासाचा विषय असल्याचे म्हटलं आहे. तसंच, माझ्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जिथे गरजेचं आहे तिथे मी माझं म्हणणे मांडलं आहे. मी पोलिस आणि कोर्टासमोर माझ्यावतीने म्हणणे मांडलं आहे, असंही ज्योती मौर्य यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अलोक मौर्य यांच्या आरोपानुसार ज्योती अधिकारी झाल्यानंतरच तिने माझी फसवणूक केली यावरही त्यांनी एका शब्दात उत्तर देत विषय टाळण्याचा प्रय़त्न केला. हा त्याचा स्वतःचा दृष्टिकोन आहे, असं म्हणत अधिक बोलणं टाळलं.
2010साली ज्योतीचे लग्न अलोक यांच्यासोबत झाले होते. लग्नानंतर पुढील शिक्षण सुरू ठेवण्याची तिची इच्छा होती. आलोकने ज्योतीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या कमाईतून ज्योतीला शिकवलं. एका चांगल्या कोचिंग सेंटरमध्येही तिचे अॅडमिशन केले. पण अधिकारी होताच ज्योतीने सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला. तसंच, मनीष दुबे नावाच्या व्यक्तीसोबत तिचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपही अलोकने केला आहे. ज्योतीमुळं माझ्या जीवाला धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.