नवी दिल्ली: देशातील लोकांची मानसिकता बदलली आहे. लोकांनी भाजपला नाकारायला सुरुवात केली आहे. दिल्लीच्या निकालांमुळे यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी 'झी २४ तास'शी संवाद साधला.
दिल्लीत 'आप'ची सरशी, पण भाजपचाही मोठा फायदा
यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, दिल्लीत देशाच्या सगळ्या भागातील लोक वास्तव्याला आहेत. एका अर्थाने दिल्लीत संपूर्ण भारत नांदतो. मात्र, आता याच लोकांनी भाजपला नाकारले आहे. याचा अर्थ संपूर्ण देशातील लोकांची मानसिकता हीच आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. यापूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंडमध्ये जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले. आता दिल्लीतील जनताही भाजपला सत्तेवरून दूर करण्यात यशस्वी ठरली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
'आप'चा विजय निश्चित; प्रशांत किशोर केजरीवालांच्या भेटीला
दिल्लीकरांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे कॉम्बिनेशन नाकारले. भाजपकडून या निवडणुकीसाठी सत्ता, संपत्ती आणि मंत्र्यांचा फौजफाटा लावण्यात आला होता. मात्र, दिल्लीतील जनतेला भाजप पक्ष नकोसा झाला होता. त्यामुळेच लोकांनी पर्याय म्हणून अरविंद केजरीवाल यांची निवड केल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे आतापर्यंतचे कल पाहता आम आदमी पक्षाला (आप) बहुमत मिळणार असल्याचे दिसत आहे. तर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहील. तर काँग्रेसला पुन्हा एकदा भोपळाही फोडता येणार नाही, असे चित्र आहे.