मुंबई : बुधवारी शिवसेना भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांसोबत राडा घालणाऱ्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीने उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी काल केलेल्या कृत्याचे समर्थन केल्याचं दिसून येतंय. "कुणी अंगावर आले की शिंगावर घ्या" या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे शिवसैनिकांनी कृती केल्याने उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे.
शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्यासह २५ ते ३० शिवसैनिकांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काल तुमच्या मारामारीचे व्हिडिओ आपण पाहिल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले होते. राम मंदिराच्या जमिनीच्या बाबतीत घोटाळ्याचा आरोप सामनातून केला गेला होताय आरोपांबाबत भाजपने शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं, या वेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
शिवसेना (ShivSena) भवनासमोर झालेल्या राड्याप्रकरणी माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह 7 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू जगडे, राकेश देशमुख, शशी पुडने यांचा समावेश आहे.