नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून नागरिकांना वारंवार एकमेकांपासून दूर राहण्याच्या (सोशल डिस्टन्सिंग) सूचना देण्यात आल्या आहेत. देशाचा पंतप्रधान आणि सामान्य माणूस या दोघांनाही कोरोनाचा सारखाच धोका असल्याचे नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते. बुधवारी दिल्लीत पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी स्वत: सोशल डिस्टन्सिंगचे अनुकरण करताना दिसले. पंतप्रधान मोदींच्या ७ लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली. यावेळी सर्व मंत्री एकमेकांपासून ठराविक अंतरावर बसल्याचे दिसून आले.
कोरोनाचा वेग किती भयानक? आकडेवारी ऐकून तुमचा थरकाप उडेल
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय असल्याचे मोदींनी कालच्या भाषणात सांगितले होते. त्यामुळे लोकांनी सरकारच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. जगातील सामर्थ्यशाली देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. त्यामुळे आपण असाच निष्काळजीपणा सुरु ठेवला तर कोरोनामुळे संपूर्ण देश उद्ध्वस्त होईल, असा इशारा मोदींनी दिला होता.
coronavirus: जान है, तो जहान है.... मोदींचा नागरिकांना सल्ला
#WATCH Union Cabinet meeting chaired by Prime Minister Narendra Modi was held at 7 Lok Kalyan Marg earlier today, social distancing was seen during the meeting. #COVID19 pic.twitter.com/zeisrEgiHR
— ANI (@ANI) March 25, 2020
संपूर्ण देशात मंगळवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आता सरकार पुढील उपाययोजनांची आखणी करत आहे. ही परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास काय करायचे, यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे सध्याची वेळ निर्णायक आहे. हा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात गेल्यास देश मोठ्या संकटात सापडेल. भविष्यात आपण कोरोनाला कितपत थोपवू शकतो, हे आपल्या सध्याच्या कृतीवर अवलंबून असल्याचेही मोदींनी सांगितले होते.