नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून भाषण केले.
मोदींचे हे चौथे भाषण सगळ्यात लहान भाषण ठरले आहे. पण यंदाच्या त्यांच्या भाषणात महिलांच्या प्रश्नांनाही खास स्थान होते. काम करणार्या आणि गृहिणी महिला अशा दोघींच्या हितार्थ सरकारच्या काय उपाय योजना आहेत याबाबत मोदींनी भाषणात माहिती दिली. 'तलाक' शब्दावरून मुस्लिम महिला जे अभियान करत आहेत त्याचेही त्यांनी कौतुक केले.
तलाक तलाक तलाक
तलाक या शब्दाचा तीनदा उल्लेख करून घटस्फ़ोट देण्याची प्रथा मुस्लिम समाजात आहे. पण या विरोधात मुस्लिम महिलादेखील लढत आहेत. त्यांचं मी कौतुक करतो. अशाप्रकारे घटस्फोट दिल्याने महिला दुर्बल, त्यांना कुठलाच आश्रय राहत नाही. त्यांच्या आंदोलनाला बुद्धिजीवी आणि मिडियाची मिळालेली मदत स्वागतार्ह आहे. अशा मुस्लिम महिलांचं मी अभिनंदन करतो. या मुस्लिम महिलांच्या आंदोलनात हिंदूस्तान मदत करेल. Women Empowerment च्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल असा विश्वास नरेंद्र मोदींनी बोलून दाखवला आहे.
उज्ज्वल योजना
भारतीय गृहीणींना लाकडी चुल्हीच्या धुरापासून दूर ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न फायदेशीर ठरत आहेत. अडीच करोड गरीब स्त्रियांना चुल्हीपासून दूर ठेवण्यास मदत होईल. गरीब आता देशाच्या प्रगतीशी जोडला गेला आहे. 1 मे 2016 पासून पंतप्रधानांनी उज्ज्वल योजना सुरू केली. याद्वारा गरीब महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन मिळेल.
महिलांसाठी बदलला ' लेबर लॉ'
आजकाल अनेक स्त्रिया नोकरदार आहेत. अधिकाधिक महिलांना फॅक्टरीमध्ये काम करण्याची संधी मिळायला हवी. त्यासाठी लेबर लॉमध्येही बदल होणं गरजेचे आहे. त्यासाठी आगामी काळात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील.
मॅटर्निटी लिव्ह चा काळ वाढवला
स्त्री ही कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहे. तिच्या स्वास्थ्याकडेही पुरेसे लक्ष देणं गरजेचे आहे. त्यासाठी नवमातांना दिली जाणारी ' मॅटर्निटी लिव्ह' वाढवली जाणार आहे. पूर्वी 12 आठवड्यांची असणारी ही लिव्ह आता 26 आठवड्यांची करण्यात आली आहे.