मुंबई : सौंदर्यप्रसाधनांबाबत सांगावं, तर दर दिवशी कमीजास्त प्रमाणात सौंदर्यप्रसाधनांचा वापर केला जातोच. मुख्य म्हणजे सौंदर्य प्रसाधनांमध्येही अमुक एका ब्रँडचीच वस्तू आपल्याला जास्त आवडते असं म्हणणारे अनेकजण आहेत. यात काही ब्रँड्सना महिला वर्गाची विशेष पसंती मिळते. त्यापैकीच एक म्हणजे Lakme.
वर्षानुवर्षे सौंदर्याच्या या झगमगणाऱ्या विश्वात अतिशय लोकप्रिय असणाऱ्या या ब्रँडशी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि उद्योग जगतातील एक मानाचं नाव, जे.आर.डी टाटा यांचं नाव जोडलं जातं.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहुविध मार्गांनी अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. अशा परिस्थितीत पर्सनल केअर प्रोडक्ट्समध्ये भारतीय बनावटीचे अतिशय कमी प्रोडक्ट्स होते. अशा परिस्थितीमध्ये उच्चभ्रू वर्गातील महिला परदेशी सौंदर्यप्रसाधनांच्या वापरावर भर देत होत्या. तर मध्यमवर्गीय महिला घरातच तयार करण्यात आलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करताना दिसत होत्या.
सौंदर्यप्रसाधनांच्या आयातीसाठी भारताकडून मोठ्या प्रमाणावर परदेशात आर्थिक उलाढाल केली जात होती. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना याच गोष्टीची चिंता वाटली आणि त्यांच्या याच चिंतेनं लॅक्मेला जन्म दिला.
लॅक्मेला टाटा ऑईल मिल्स कंपनीचं पूर्ण हक्क असणाऱ्या सब्सिडियरीच्या रुपात सुरु करण्यात आलं. लॅक्मे हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा ब्रँड होता आणि आहे.
lakme या ब्रँडला आज विश्वमान्यता मिळाली आहे. पण, तुम्हाला माहितीये का या ब्रँडचं नाव आणि देवी लक्ष्मीचा थेट संबंध आहे. लॅक्मे हा जरी फ्रेंच शब्द असला तरीही त्याचा अर्थ होतो, लक्ष्मी.
ज्यावेळी ही कंपनी सुरु करण्यात आली त्यावेळी त्यातील फ्रेंच गुंतवणुकदारांकडून नावासाठीचा पर्याय मागवण्यात आला. एक असं नाव ज्यामध्ये दोन्ही देशांची झलक असेल, अशी अपेक्षा पुढे ठेवण्यात आली.
अपेक्षेच्या याच ओघात Lakme हा शब्द समोर आला. त्यावेळी हा शब्द पॅरिसमध्ये एका ओपेरापासून प्रेरित होता. तिथं एका ओपेराचं नाव लॅक्मे असं होतं. समृद्धी आणि सौंदर्याची देवी, लक्ष्मीच्या नावावर ते आधारित होतं. ज्यानंतर लॅक्मे हे नाव या सौंदर्यप्रसाधनांच्या कंपनीसाठी कायमस्वरुपी ठरवण्यात आलं.
एका लहान खोलीत केली सुरुवात
पेडर रोड येथील एका लहानशा खोलीमध्ये या ब्रँडची सुरुवात झाली. ज्यानंतर लाँच होताच या कंपनीच्या प्रोडक्ट रेंजमध्ये मोठी वाढ झाली. 1960 च्या सुमारास कंपनीच्या मोठ्या जागेची गरज भासली. याच गरजेनं लॅक्मे TOMCO च्या सेवरी फॅक्ट्रीमध्ये शिफ्ट करण्यात आलं.
काळ पुढे गेला तसतशी लॅक्मेला मिळणारी लोकप्रियता वाढली. पुढे हे प्रोडक्ट्स प्रमोट करण्यासाठी अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्रींची साथ मिळाली. पुढे 1980 पासून लँक्मेनं ब्युटी सलूनचीही सुरुवात केली.
प्रत्येकाला सुंदर दिसण्याचा हक्क आहे आणि त्यासाठीच लॅक्मेकडून वारंवार प्रयत्न करण्यात आले. एका खोलीतून सुरु झालेला हा प्रवास आता संपूर्ण जगभरात पसरला आहे. लॅक्मेची ही व्याप्ती खरंच वाखाणण्याजोगी आहे हेच खरं.