परमबीर सिंगांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे.  

Updated: Mar 24, 2021, 02:17 PM IST
परमबीर सिंगांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. त्याचवेळी परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयात जाण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. आजच उच्च न्यायालयात अर्ज करू, अशी माहिती मुकूल रोहतगी यांनी दिली. (Supreme Court refuses to hear Parambir Singh's petition)

गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रतिवादी का केले नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयात जाण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयात का आलात? असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना केला. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला. 

यावर मुकूल रोहोतगी यांनी आजच हायकोर्टात याचिका करणार असल्याचे सांगितलये. तर यावर उद्याच सुनावणी घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला देण्यात द्यावे, अशी विनंतीही मुकूल रोहतगी यांनी केली. त्याशिवाय या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रतिवादी करणे गरजेचं असल्याचंही रोहोतगी म्हणाले. त्यानुसार आता परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागणार आहे.

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका होऊ लागली.  त्यानंतर गृह विभागाने मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली.  अचानक करण्यात आलेल्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्याकडून चुका झाल्याचा ठपका ठेवला. त्यानंतर परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. 100 कोटीची वसूली करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी एका पत्राद्वारे केला होता. 

त्याबाबत अनिल देशमुख यांच्या गैरव्यवहारांची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेली बदली बेकायदेशीर असून, ती रद्द करण्यात यावी आणि पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावं, अशा मागण्या सिंग यांनी याचिकेत केल्या होत्या.