VIDEO: 'असं करुन काही होणार नाही, खाली ये'; PM मोदींचे भाषण सुरु असतानाच विजेच्या खांबावर चढली मुलगी

Telangana Election 2023 : तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेवेळी एक विचित्र घटना घडली. पंतप्रधानांचे भाषण सुरु असतानाच एक मुलगी थेट विजेच्या खांबावर चढली. बरीच विनंती केल्यानंतर ही मुलगी खाली उतरली या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 12, 2023, 09:37 AM IST
VIDEO: 'असं करुन काही होणार नाही, खाली ये'; PM मोदींचे भाषण सुरु असतानाच विजेच्या खांबावर चढली मुलगी  title=

Telangana Election 2023 : तेलंगणात (Telangana) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) शनिवारी सिकंदराबादला पोहोचले होते. यावेळी त्यांनी एक प्रचार सभा घेतली. मात्र या सभेत एक विचित्र प्रकार घडला आहे. पंतप्रधान मोदी मंचावरून भाषण करत असताना अचानक एक मुलगी सभेसाठी लावलेल्या लाईटच्या खांबावर चढली. यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. पंतप्रधान मोदींनी मुलीला खाली उतरण्याची विनंती केली आणि तिची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. यानंतर मुलीने म्हणणं ऐकलं आणि ती खाली उतरल. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

तेलंगणामध्ये घडलेल्या या घटनेने पंतप्रधान मोदींचेही लक्ष वेधले होतं. सिकंदराबादमधील निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदी मंचावरून उपस्थितांना संबोधित करत असताना सभेत एक मुलगी विजेच्या खांबावर चढली. मंचावरून उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी तिला दुखापत होऊ शकते म्हणून असे करू नको असे सांगतिले. मात्र ती मुलगी कोणाचेही ऐकालयला तयार नव्हती. पंतप्रधानांच्या विनंतीनंतरही ती खांबावर चढतच राहिली. पंतप्रधान मोदींच्या आश्वासनानंतर मुलगी खांबावरून खाली उतरली. 

भर सभेत मुलगी खांबावर चढल्याने नेते आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. सर्वजण मुलीला खाली उतरण्याची विनंती करत होते. यानंतर पंतप्रधान मोदी यांनीही स्टेजवरून तिला खाली येण्याची विनंती केली. "मुली, खाली ये, बघ हे बरोबर नाही. ही वायर खराब झाली आहे. आम्ही तुझ्यासोबत आहोत, तू खाली ये बेटा. बघ, या वायरची अवस्था चांगली नाही. तिथे शॉर्ट सर्किट होऊ शकते. बेटा, इथे असे करून काही फायदा होणार नाही. मी तुमच्यासाठी इथे आलो आहे," असे पंतप्रधान त्या मुलीला म्हणत होते. बरीच समजूत काढल्यानंतर ती मुलगी खाली आली.

दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बीआरएस सरकारवर निशाणा साधला. "10 वर्षांपूर्वी येथे स्थापन झालेले सरकार तेलंगणाच्या स्वाभिमानाचे आणि सन्मानाचे रक्षण करू शकले नाही. तेलंगणातील लोकांच्या क्षमतेचे जगाने कौतुक केले आहे. मात्र, तेलंगणा सरकारने जनतेची निराशा केली आहे. आंदोलनाच्या वेळी मागासवर्गीयाला तेलंगणाचा पहिला मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन जनतेला देण्यात आले होते. मात्र, राज्याच्या स्थापनेनंतर केसीआर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मागासवर्गीयांच्या आशा-आकांक्षांचा चुराडा केला," अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.