मुंबई : रस्त्याने गाडी चालवताना अनेक वेळा तुम्ही हे पाहिलं असेल की, पोलिस वाहनांना थांबवतात आणि त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करतात आणि तुमच्याकडे वाहनांशीसंबंधीत कागदपत्र नसेल, तर पोलिस तुमच्यावरती कारवाई करतात. परंतु तुम्ही हे बऱ्याचदा पाहिले असेल की, पोलिस बाईक किंवा कारची चावी काढून घेतात किंवा गाडीच्या चाकामधील हवा काढतात. परंतु तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की, वाहतूक पोलिस चेकिंग करताना वाहनाची चावी काढून घेऊ शकत नाही. त्यांना हे करण्याचा कायद्याने अधिकार दिलेला नाही.
ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याला चेकिंग दरम्यान तुमच्या गाडीची चावी काढण्याचा अधिकार नाही. याशिवाय ते तुमच्या गाडीच्या टायरची हवाही देखील काढू शकत नाहीत किंवा तुमच्याशी गैरवर्तन करू शकत नाहीत. एखाद्या ट्रॅफिक पोलिसाने तुमच्याशी असे केले तर तुम्ही पुरावा म्हणून त्या घटनेचा व्हिडीओ बनवावा.
मग तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे यासंदर्भात तक्रार करू शकता, कारण मोटार वाहन कायदा 2019 अंतर्गत वाहतूक पोलिसांना असा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही.
यानंतरही पोलिस स्टेशन किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गैरवर्तन करणाऱ्या वाहतूक पोलिसाची बाजू घेतल्यास हे प्रकरण हायकोर्टात नेऊ शकता. जर तुम्ही दारिद्र्यरेषेखालील असाल आणि तुमच्याकडे बीपीएल कार्ड असेल, तर कायद्याचे जाणकार वकील तुम्हाला मोफत सल्ला देतील. त्यानंतर हायकोर्ट त्या वाहतूक पोलिसाला आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समन्स काढेल.
हे जाणून घ्या की मोटार वाहन कायदा 2019 कोणत्याही वाहतूक पोलिसाला चेकिंगच्या नावाखाली गुन्हा करण्याचा अधिकार देत नाही. अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी तो तुमच्याशी गैरवर्तन करू शकत नाही आणि तुमच्या गाडीची चावी काढू शकत नाही.
विशेष म्हणजे, एका आरटीआयला उत्तर देताना हरियाणा पोलिसांनी म्हटले आहे की, वाहतूक पोलिस हाताचा इशारा देऊन तुमचे वाहन थांबवू शकतात परंतु ते तुमच्या गाडीच्या चावीला हात लावू शकत नाही. हे लक्षात घ्या की, तुमच्याकडे कोणतेही कागदपत्र नसले तर, पोलिस त्यासंदर्भात तुमच्यावरती दंड आकारु शकतात, तुमची गाडी थांबवू शकतात. परंतु तुमच्या गाडीला नुकसान पोहोचवू शकत नाही.