पैशांसाठी काहीही! मुलगीच बनली पत्नी, 10 वर्षांत मिळवले 12 लाख रुपये

Trending News In Marathi: वडिलांचे पेन्शन मिळावे यासाठी मुलीने रचलेला प्लान पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तब्बल 12 वर्षे तरुणीने सरकारी यंत्रणांना गुंगारा दिला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 8, 2023, 01:05 PM IST
पैशांसाठी काहीही! मुलगीच बनली पत्नी, 10 वर्षांत मिळवले 12 लाख रुपये title=
trending news Daughter Getting father Pension For 10 Years By Becoming Wife On Paper

Trending News In Marathi: वडील सरकारी खात्यात नोकरीला त्यांच्या मृत्यूनंतर पेन्शन (Retirement Pension) कायम राहावी यासाठी लेकीने एक प्लान आखला. 10 वर्षांपर्यंत मुलीने ठरवलेल्या प्लानप्रमाणेच सगळं सुरळीत सुरु होते. मात्र, तिची एक चूक ठरली आणि सगळा बनाव समोर आला. उत्तर प्रदेशामधील एटा येथील अलीगंज येथील ही घटना आहे. सरकार दरबारी (Government Service) लेखापाल म्हणून नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्याची पोटची मुलगीच कागदोपत्री त्याची पत्नी बनली आहे. त्यानंतर जवळपास 10 वर्षांपर्यंत तिने सरकारकडून दिले जाणारे पेन्शन घेतले. याकाळात तिने जवळपास सरकारचे 12 लाख रुपये हडपले आहेत. मात्र, तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. 

वडिलांचीच पत्नी बनली

कुंचादायम खाँ येथे राहणारे विजारत उल्ला खाँ हे लेखापाल म्हणून काम करत होते. 30 नोव्हेंबर 1987 रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर 2 जानेवारी 2013मध्ये त्यांचे निधन झाले. पण त्यांच्या आधीच त्यांची पत्नी साबिया बेगम हिचे निधन झाले होते. मात्र, त्यांच्या मुलीने ही बाब लपवून ठेवली. त्यांची मुलगी मोहसिन परवेज हिने पेन्शनच्या कागदपत्रांवर तिचे नाव साबिया बेगम असं दाखल करुन पेन्शनसाठी पात्र असल्याचे दाखवले. 

बनावट कागदपत्रे बनवली

याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी मानवेंद्र सिंह यांनी याप्रकरणाची उच्च स्तरिय चौकशी केली. या चौकशीदरम्यान मोहसिनने पेन्शन कागदपत्रांची हेराफेरी केल्याचे समोर आले. मोहसिनने बनावट कागदपत्रांचा वापर करत शासकीय संपत्तीचा दुरुपयोग केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

आरोपीला अटक 

प्रशासनाने मोहसिनविरोधात एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी महिलेविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिस अधिकारी प्रेमपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणात दोषी ठरवली गेल्यापासून आरोपी फरार होती. मात्र, पोलिसांकडून तिचा कसून शोध घेतला जात होता. सोमवारी तिला अटक करण्यात आली आहे.