Twitter Data leak : जगभरात सध्या विविध प्रकारचे सायबर हल्ले होत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार (Cyber Fraud) लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच वेळा हे सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यात यशस्वीही होतात. मात्र आता जगातील सर्वात मोठ्या सायबर हल्ल्याची माहिती समोर आली आहे. ट्विटरवर (Twitter) आतापर्यंतचे सर्वात मोठे डेटा ब्रीचचे (data breach) प्रकरण समोर आले आहे. हॅकर्सनी 40 कोटी ट्विटर युजर्सचा डेटा हॅक करत डार्क वेबवर विकला जात आहे.
नुकतीच ट्विटरची मालकी मिळवलेल्या इलॉन मस्क (Elon Musk) यांच्यासाठी हे संकट मोठे डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. याआधाही नोव्हेंबरमध्ये 54 लाख लोकांचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा इतक्या मोठ्या प्रमाणात ट्विटरचा डेटा लीक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नोव्हेंबरमध्ये लीक झालेल्या डेटाबाबत आइरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनने (DPC) तपास सुरुवात केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे डेटा लीक झाल्याचे पुरावेच हॅकर्सनी दिले आहेत. यामध्ये युजर्सचे नाव, ईमेल, युजरनेम, फॉलोअर्सची संख्या आणि काही प्रकरणांमध्ये फोन नंबर समाविष्ट आहे. या डेटा लीक प्रकरणामध्ये अनेक हायप्रोफाईल लोकांचीही नावे आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामध्ये गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्यापासून ते बॉलिवूड अभिनेता सलमान खानचाही समावेश आहे. तसेच भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय, डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांचे तपशीलही या यादीत आहेत.
या पोस्टमध्ये ट्विटर आणि इलॉन मस्क ही पोस्ट वाचत असतील तर त्यांनी या डेटा ब्रीचसाठी 5.4 मिलीयन दंड भरायला तयार व्हावे असे म्हटले आहे. पण 40 कोटी युजर्ससाठी किती दंड भरावा लागेल याची कल्पना न केलेलीच बरी. "जर तुम्हाला दंड भरायचा नसेल तर एकच पर्याय आहे तो म्हणजे तुम्हाला हा डेटा खरेदी करावा लागेल. एखाद्या मध्यस्थाच्या मदतीने हा करार करता येईल. करारानंतर सर्व डेटा डिलीट केला जाईल आणि पुन्हा कोणालाही विकला जाणार नाही," असे या हॅकर्सनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या हॅकिंगची बातमी समोर आल्यावर तज्ज्ञांनीही आपली बाजू मांडली आणि या हॅकिंगची संभाव्य कारणे सांगितली आहेत. तज्ज्ञांच्या मते हे हॅकिंग एपीआयमधील त्रुटीमुळे झालेले असू शकते. याआधीही ट्विटरच्या सुमारे 5.4 दशलक्ष म्हणजेच 54 लाख युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक झाला होता.