सुकमा जिल्ह्यातील चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

किस्टाराम पोलीस हद्दीत हे पथक पोहोचताच नक्षलवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला.

Updated: Nov 26, 2018, 04:09 PM IST
सुकमा जिल्ह्यातील चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा  title=

सुकमा: छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आठ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी छत्तीसगढ पोलीस दलाच्या दोन जवानांना वीरमरण आले. छत्तीसगड आणि तेलंगण सीमेवर नक्षलवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर सीमा सुरक्षा दल आणि विशेष कृती दलाचं संयुक्त पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. या अभियानाला 'प्रहर चार' असं नाव देण्यात आले होते. 

येथील किस्टाराम परिसरातील जंगलात सुरक्षा दलाचे जवान गस्त घालत असताना त्यांचा नक्षलवाद्यांशी सामना झाला. यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला. यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, या चकमकीत जिल्हा राखीव दलाचे दोन जवानही शहीद झाले. 

दरम्यान, ही चकमक अजूनही सुरुच असून या ठिकाणी सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक पाठवण्यात आल्याची माहिती नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिली.