Uddhav Thackeray Group On Congress Ahead Of INDIA Bloc Meeting: विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या 'इंडिया' आघाडीची महत्त्वाची बैठक आज नवी दिल्लीमध्ये पार पडत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच अन्य मान्यवर नेतेही नवी दिल्लीतील या बैठकीसाठी हजर राहणार आहेत. मात्र या बैठकी आधीच ठाकरे गटाने काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. आघाडीसंदर्भात भाष्य करताना काँग्रेसनेच इतर छोट्या पक्षांना समजून घेत त्यांना एकत्र करण्याची गरज आहे असं म्हटलं आहे. काँग्रेसनेच मोठ्या भावाच्या भूमिकेत जाणं, 'इंडिया' आघाडीचा चेहरा कोण हे ठरवणं या सारख्या गोष्टी फार आवश्यक असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
"काँग्रेसने युतीचे महत्त्व शिकायला हवे, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे दिला आहे. आंबेडकरांचे म्हणणे चुकीचे नाही. पण ‘युती’ आणि ‘आघाडी’चे महत्त्व प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. त्यात आंबेडकरदेखील आहेत. 2024 ची लढाई मोदी-शहांच्या ‘नव’भाजपशी आहे. त्याचबरोबर ईव्हीएम, प्रचंड पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांशी आहे. या सगळ्यांच्या जोरावर मोदी मंडळाने ‘अब की बार चारशे पार’चा आकडा लावला आहे. या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीची बैठक आज राजधानी दिल्लीत होत आहे. या बैठकीसाठी काँग्रेसने पुढाकार घेतला हे बरे झाले. पण काँग्रेसच्या आवतणाचा मान राखून किती वऱ्हाडी आणि वाजंत्री जमतात हे पाहावे लागेल. अरविंद केजरीवाल हे बैठकीस येणार नाहीत अशी अफवा होती, ती खरी नाही. त्यांच्याशिवाय दिल्ली, पंजाबचा तिढा कसा सुटणार? हरयाणासारख्या राज्यातही काँग्रेससमोर ‘आप’ उभी ठाकली आहे व 2024 च्या दृष्टीने यावर तोड काढायलाच हवी. केजरीवाल यांच्या पक्षावर भाजपकडून हल्ले सुरू आहेत. त्यांचे प्रमुख नेते तुरुंगात आहेत व ‘आप’चा एकाकी लढा सुरू आहे. अशा वेळी मोठा भाऊ म्हणून काँग्रेसने पुढे येऊन ऐक्याची भावना दाखवायला हवी. दिल्लीत नुसते जमायचे, जेवणावळी करायच्या व प्रत्येकाने हात पुसत घरी जायचे या व्यवस्थेत आता सुधारणा व्हायला हवी," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
"पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल लागले. ‘इंडिया’ आघाडीस उत्साहवर्धक निकाल नसले तरी भारतीय जनता पक्षाने हुरळून जावे असेही काही घडले नाही. काँग्रेसला 40 टक्के मते मिळाली, तरीही मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड काँग्रेसने गमावले. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मध्य प्रदेशात बदलाचे वारे वाहत होते व वातावरण काँग्रेससाठी चांगले आहे, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. ‘भारत जोडो’ यात्रेची सुरुवातच मध्य प्रदेशातून झाली. पण काँग्रेसचा सगळ्यात दारुण पराभव मध्य प्रदेशात झाला. भरवशाच्या म्हशीला ‘टोणगा’च झाला. तिन्ही राज्ये ‘इंडिया’ने गमावली नसून काँग्रेसने गमावली," असं विश्लेषण 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आलं आहे.
"काँग्रेसला विजयाचा ‘केक’ एकट्याला खायचा होता. त्यामुळे राज्यातील लहान पक्ष, आघाड्या वगैरेंना दूर ठेवले. मध्य प्रदेशात अखिलेश यादव यांना ठरवून दूर ठेवले. जेथे काँग्रेस स्वबळावर येण्याची शक्यता निर्माण होते तेथे ते कोणालाच सोबत घ्यायला तयार नाहीत व त्या अहंकारात स्वतःबरोबर ‘इंडिया’चे नुकसान करतात असा बोल लावला जातो. ही प्रतिमा काँग्रेसला पुसावी लागेल. तीन राज्यांतील पराभवामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले व मोदी-शहांना कोणीच हरवू शकत नाही असा भ्रम निर्माण झाला. ते धोकादायक आहे. मुळात हा भ्रम खरा नाही. गांधी, खरगे वगैरे नेत्यांनी मेहनत घेतली, पण राज्यात लहान पक्षांना सोबत घेतले असते तर फायदाच झाला असता," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
"तेलंगणा काँग्रेसने जिंकले ही जमेची बाजू, पण यापुढे ‘इंडिया’ आघाडी म्हणून काँग्रेसने युतीचे महत्त्व शिकायला हवे. ‘इंडिया’ आघाडीचे महत्त्व वाढवायला हवे. रथाला आज 27 घोडे आहेत, पण रथाला सारथी नाही. त्यामुळे रथ अडकून पडला आहे. ‘इंडिया’ आघाडीला संयोजक, समन्वयक, निमंत्रक जो काही असेल तो हवा आहे. अशा समन्वयकाची गरज नाही व आहे त्या परिस्थितीत ‘चालवू’ असे कुणाचे म्हणणे असेल तर ते ‘इंडिया’चे नुकसान करीत आहेत. रथाचा सारथी आता नेमावा लागेल. 19 तारखेच्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेऊनच पुढचे पाऊल टाकावे लागेल. ‘इंडिया’त अनेक अनुभवी व समजदार नेत्यांचा भरणा आहे. नेतृत्वाच्या बाबतीत आम्ही वांझोटे नाही हे आघाडीतील नेते दाखवत असतात. 2024 साठी ‘इंडिया’ आघाडीचा ‘चेहरा’ कोण? याचा फैसलाही करावा लागेल. मोदींसमोर कोण? हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
‘‘आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी भरपूर चेहरे आहेत. चॉइसच चॉइस आहे,’ असे सांगणे म्हणजे ‘‘दिल बहलाने के लिए खयाल अच्छा है’’ त्यातलाच हा प्रकार. इंडिया आघाडीस समन्वयक हवा, तसा एक चेहरा हवा. ‘हजार आचारी व रस्सा भिकारी’ या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल. काँग्रेस पक्षाला भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्या सहकारी मित्रांसोबत या दोन्ही विषयांवर चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. नुसता मोठेपणाचा आव आणून चालणार नाही. ‘इंडिया’ आघाडीत अनेक जुनेजाणते पक्ष व त्यांचे नेते आहेत. आपापल्या राज्यांचे ते स्वामी आहेत. पश्चिम बंगालात ममता, तामीळनाडूत स्टॅलीन, महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, झारखंडात सोरेन, उत्तरेत नितीश कुमार, लालू यादव, अखिलेश असे प्रमुख लोक चमत्कार घडवण्याची क्षमता राखून आहेत. दिल्ली, पंजाबात केजरीवाल यांचे नाणे चालले आहे. या सगळ्यांशी त्याचबरोबरीने चर्चा होणे गरजेचे आहे. शिवाय अनेक नवे मित्र आघाडीत येऊ इच्छितात त्यांच्याशी जुने ‘भेद’ गाडून स्वागत व्हायला हवे. कपिल सिब्बल यांच्यासारख्या लढवय्या कायदेपंडिताची ‘इंडिया’ आघाडीस मदतच होईल. प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी मोदींच्या हुकूमशाहीविरुद्ध रोज शड्डू ठोकीत आहे. हा वंचितांचा ‘फोर्स’ही सोबत घेतलाच पाहिजे. पण आघाडीतील इतरांची तशी इच्छा असेल तर काँग्रेसने अशा ‘युती’साठी पुढाकार घेतला पाहिजे," अशी इच्छा ठाकरे गटाने व्यक्त केली आहे.
"काँग्रेस हा आघाडीतील ‘मोठा’ व तसा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. 138 वा स्थापना दिवस काँग्रेस साजरा करीत असताना 2024 साठी किमान 150 लोकसभा खासदार निवडून आणण्याचा संकल्प या मंडळींनी सोडला पाहिजे. ‘इंडिया’ आघाडी मजबूत व मोकळी राहिली तरच ते शक्य आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ‘‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्त्व शिकायला हवे. हिटलरचा पराभव हा अनेक देशांच्या एकजुटीतूनच झाला होता.’’ हुकूमशाहीचा पराभव हा एकजुटीतूनच होतो. काँग्रेसला त्या दृष्टीने पुढाकार घ्यावाच लागेल. बैठका होतील. प्रश्न कृतीचा आणि ऐक्याच्या वज्रमुठीचा आहे. हिटलरचा पराभव करूच हे ध्येय हवेच हवे! इंडिया जिंकेल. तीन राज्यांतील निकाल म्हणजे भाजपचा अमरपट्टा नाही. मोदी-शहा अजिंक्य नाहीत. फक्त ‘इंडिया’ आघाडी अभेद्य हवी इतकेच," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.