UPSC CSE 2022 चा निकाल आला असून इशिता किशोरने (Ishita Kishore) या परीक्षेत बाजी मारली आहे. दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण घेतलेल्या इशिता किशोरने (Roll Number: 5809986) पहिला क्रमांक मिळवला आहे. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसरीकडे अनेकजण गुगलवर तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, इशिता किशोरच्या मॉक मुलाखतीचा (UPSC Topper Ishita Kishore Mock Interview) व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये इशिता किशोर कॉलेजियम सिस्टम, रशिया-चीनसह भारताचे संबंध, खासगीकरण, देशाची अर्थव्यवस्था यासहित अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर आपलं मत मांडत आहे. व्हिडीओत इशिता किशोर अत्यंत आत्मविश्वासाने पाचही मुलाखतदारांच्या प्रश्नांना धडाधड उत्तरं देताना दिसत आहे.
मुलाखतीत इशिता आपण स्पोर्ट्समध्ये फार सक्रीय होतो असं सांगत आहे. शाळेत ती ऑल राऊंडर होती. इशिताचं म्हणणं आहे की, ऑलराऊंडर होण्यासह नेतृत्वकौशल्य आणि संघाला सोबत घेऊन खेळण्याचं कौशल्यही गरजेचं आहे.
हा व्हिडीओ युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी फार मदतशीर ठरु शकतो. हा व्हिडीओ तुम्ही येथे पाहू शकता....
इशिता किशोरचे वडील हवाई दलात अधिकारी आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब ग्रेटर नोएडामध्ये वास्तव्यास आहे. "आपले वडील नेहमी देशसेवेसाठी तत्पर असायचे. लहानपणी त्यांना देशसेवा करताना पाहिल्यानंतर आपणही मोठे झाल्यावर देशाची सेवा करायला मिळेल अशीच नोकरी करायची असा मी निश्चय केला होता," असं इशिता सांगते. आपण घरीच सर्व अभ्यास केला. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे माझे पर्यायी विषय होते अशी माहिती तिने दिली आहे.
5 जून 2022 रोजी UPSC CSE 2022 परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परीक्षेसाठी एकूण 11 लाख 35 हजार 697 उमेदवारांनी अर्ज केला होता. यामधील 5 लाख 73 हजार 735 उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते. सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या लेखी (मेन्स) परीक्षेसाठी एकूण 13 हजार 90 उमेदवार पात्र ठरले होते. एकूण 2529 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र झाले होते. यानंतर आज 23 मे रोजी परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत.
दरम्यान निकालात मुलींनी बाजी मारली पहिल्या तिन्ही स्थानावर मुली आहेत. इशिता किशोर पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गरिमा लोहिया आणि तिसऱ्यावर उमा हरथी आहे.
UPSC CSE 2022 मध्ये एकूण 933 उमेदवार निवडले गेले आहेत. यामध्ये 613 पुरुष आणि 320 महिला उमेदवारांचा समावेश आहे. एकूण 345 उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. 99 ईडब्ल्यूएस, 263 ओबीसी, 154 एससी, आणि 72 एसटी प्रवर्गातील आहेत. याशिवाय 178 उमेदवारांना राखीव यादीत ठेवण्यात आले आहे.
UPSC CSE 2022 टॉपर इशिता किशोरने दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी प्राप्त केली आहे. तिने अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. दोन वर्षे नोकरी केल्यानंतर इशिताने यूपीएससीची तयारी सुरू केली होती. दुसरीकडे, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या गरिमा लोहियाने दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमाल महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. ती बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील रहिवासी आहे. पदवी शिक्षण घेतल्यानंतर गरिमाने यूपीएससीची तयारी सुरू केली होती.