मुंबई : ही घटना वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. कारण माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना मन सुन्न करणारी आहे. अनेकदा काही घटना या फक्त आपल्याला स्तब्ध करून जातात. आईच्या पेन्शनकरता पाच मुलांनी मिळून आईचा मृतदेह तब्बल चार महिने लपवून ठेवला आणि सरकारी पेन्शनचे पैसे बळकावले. मात्र गुन्हा लपता लपत नाही... अखेर ही गोष्ट उघडकीस आलीच.
वाराणसीतील कबीरनगर येथे पाच मुलांनी आपली आई अमरावती देवीचा मृतदेह 4 महिने लपवून ठेवला होता. 70 वर्षीय आईचे निधन 13 जानेवारी रोजी झाले होते. त्यांचे पती दयाशंकर कस्टम विभागात सुपरिटेंडेंट होते. ज्यांची पेन्शन अमरावतीदेवींना मिळत होती. अचानक त्याचं निधन झालं तेव्हा मुलं आणि सुनांनी मिळून एक प्लान केला. या मुलांनी आईच्या मृतदेहावर केमिकल लावून तो मृतदेह 4 महिने ठेवला आणि पेन्शन घेत राहिले.
पण, अखेर हा सगळा प्रकार शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. ही मुलं आणि सूना अमरावती देवींवर अत्याचार करत, अशीही माहिती मिळतेय... त्यांची पेन्शन मिळवण्याकरता त्यांनी हा कट रचला. आता पोलीस या सर्व प्रकाराची कसून चौकशी करत आहेत.