Weather Update : महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईसह उपनगरीय भागांतून पावसानं काढता पाय घेतला आहे. असं असलं तरीही कोकणात मात्र काही भागांमध्ये अद्यापही अधूनमधून पावसाच्या सरींची बरसता होताना दिसत आहे. इथं पावसानं परतीचा प्रवास सुरु केलेला असतानाच तिथं आता तापमानवाढ होत असल्यामुळं ऑक्टोबर हिटच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. किंबहुना येत्या काळात ही तापमानवाढ आणखी तीव्र होणार असून, हिवाळा कधी सुरु होतोय याचीच विचारणा होताना दिसणार आहे.
उन्हासोबत वातावरणात आर्द्रतेची पातळी वाढली असल्यामुळं सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानात वाढ झाल्याचं निदर्शनास येत आहे. ज्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामानात झालेल्या या बदलामुळं सध्या हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये देशातील केरळ भागामध्ये किनारपट्टी क्षेत्रात पावसाच्या सरींची अधूनमधून हजेरी असणार आहे. तर, पश्चिमी विक्षोभामुळं चेन्नई, आंध्रमध्येसुद्धा पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील. तर, याच भागांमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सध्या पर्यटनाच्या मोसमाला सुरुवात होत असल्यामुळं या दरम्यान देशाच्या उत्तरेकडे दाणाऱ्यांना उत्तम हवामानाचा अनुभव घेता येणार असल्याचीच चिन्हं आहेत.
खासगी हवामान संस्था 'स्कायमेट'च्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये कर्नाटकच्या किनारपट्टी भागासह उत्तर केरळ, दक्षिण कर्नाटकचा अंतर्गत भाग आणि नजीकच्या पट्ट्यामध्ये पावसाच्या सरींची बरसात होणार आहे. तर, पूर्वोत्तर भारत, उप हिमालय क्षेत्र, पश्चिम बंगाल, आंध्रचा किनारपट्टी भाग, तामिळनाडू येथे मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील. पण, किनाऱ्यालगतच्या भागात हवेत आर्द्रतेचं प्रमाणही जास्त असणार आहे.