मुंबई : प्रत्येकजण आपल्या शरीराची, आरोग्याची काळजी घेत असतो. त्यासाठी आवश्यक ते सगळं करुन कोणताही गंभीर आजार कसा टाळता येईल याकडे आपलं लक्ष असतं. पण तुम्हाला भविष्यात कोणते गंभीर आजार होऊ शकतात हे आधीच समजलं तर? एकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण यावरच अमेरिकन शास्त्रज्ञानं संशोधन केलंय. अर्थातच असं झालं तर आपल्याला आतापासूनच सावधगिरी बाळगता येईल. मात्र, असं खरंच शक्य आहे का? असा प्रश्न पडू शकतो. पण हे खरंच शक्य आहे. कारण जमाना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’च्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला भविष्यात कोणत्या गंभीर आजारांचा धोका आहे हे समजू शकेल. न्यूयॉर्कच्या स्टेट युनिव्हर्सिटी आणि बफेलो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी त्याबाबतची प्रणाली विकसित केलीय. ‘जर्नल ऑफ फार्माकोकायनेटिक्स अँड फार्माकोडायनेमिक्स’मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
या मॉडेलनुसार माणसाच्या चयापचय क्रियेचा तसेच हृदयासंबंधी बायोमार्करचा अभ्यास केला जातो.
जैविक प्रक्रियेच्या माध्यमातून शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी, बॉडी मास इंडेक्स, ग्लुकोज म्हणजेच रक्तातील साखर आणि रक्तदाब हे घटक किती आहेत हे समजते. त्यावरून भविष्यात प्रकृती कशी असेल? याचा अंदाज बांधता येईल. माणसाचं वय वाढल्यावर त्याच्या चयापचय आणि श्वसनाबाबतचे आजार आधीच लक्षात येऊ शकतील.
बफेलो युनिव्हर्सिटीतील भारतीय वंशाचे संशोधक मुरली रामनाथन यांच्या म्हणण्यानुसार या नव्या तंत्रज्ञानामुळे आपण कोणत्याही आजारपणाच्या विकासाचा क्रम व्यवस्थितपणे समजून घेऊ शकू. त्यामुळे त्यांच्यावर आधीच उपाययोजना करण्यास वेळ मिळेल. एकूणच काय तर फिट आणि फाईन राहण्यासाठी हे संशोधन खूप महत्त्वाचं आहे. त्यातून माणसाचं आयुष्यमानही वाढणार हे नक्की.