नवी दिल्ली : संपूर्ण जगात सध्या कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. या विषाणूच्या माहामारीमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. भारतात देखील लॉकडाऊन घोषित करून दोन महिने उलटले आहेत. त्यामुळे नोकरी व्यवसाय करण्याऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक नियम शिथिल करण्यात आले असले तरी मात्र जनजीवन अद्यापही पूर्ण पणे रूळावर आलेले नाही. अशा परिस्थितीत लोकांवर मानसिक तणाव वाढत आहे.
नुकताच केलेल्या एका सर्वेक्षणात असं समोर आलं आहे की, भारतातील तब्बल ६१ टक्के जनता मानसिक तणावाखाली जगत आहे. मिलेनियल्स इंडियाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जेन जी म्हणजे १९९७ ते २०२० दरम्यान जन्मलेले लोक आणि मिलेनियल्स म्हणजे १९८१ आणि १९९६ दरम्यान जन्म घेतलेल्या ६०० लोकांना ऑनलाइन प्रश्न विचारण्यात आले.
एप्रिल ते मे दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात असं समोर आलं आहे की, २७ टक्के जेन जी आणि १९ टक्के मिलेनियल्स लोकांच्या मानसिक आरोग्यावर लॉकडाऊनचे वाईट परिणाम झाले आहेत. शिवाय बेबी बूमर्स म्हणजे १९४६ आणि १९६४ दरम्यान जन्म घेतल्या लोकांवर लॉकडाऊनचा फारसा परिणाम झालेला नाही.
लॉकडाऊनचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांच्या जीवनावर जास्त झाला असल्याचं देखील या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. लॉकडाऊनमुळे घरातील नोकरदार वर्ग देखील कामावर येवू शकत नाही. त्यामुळे मोठ्या कुटुंबातील महिलांवर कामाचा जास्त ताण पडत आहे.
तर काही लोकांनी वर्क फ्रॉम होमवर देखील प्रश्न उपस्थित केला आहे. वर्क फ्रॉम होम योग्य नसल्याचं देखील अनेकांचं म्हणणं आहे. तब्बल ७५ टक्के लोकांना घरातून काम करण्यासाठी अनेक संमस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक आपल्या कार्यालयात जावून काम करण्याच्या प्रतिक्षेत आहेत.