Yogi Adityanath 2.0 : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहाणार आहेत.
भाजपशासित राज्यांचे १२ मुख्यमंत्री आणि पाच राज्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनिल अंबानी, अदानी ग्रुपचे गौतम अदानी, बाबा रामदेव, आनंद महिंद्रा यांसारख्या बड्या उद्योगपतींनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.
विरोधी नेत्यांना आमंत्रण
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. ज्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे त्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे सरचिटणीस मुलायम सिंह यादव, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बसपा सुप्रीमो मायावती यांचा समावेश आहे. मात्र, या सोहळ्याला विरोधी पक्षनेते उपस्थित की नाही, याबाबत अनेकांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनाही आमंत्रण
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. त्यात अभिनेत्री कंगना राणौत, अनुपम खेर, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांसारख्या चित्रपटातील व्यक्तिरेखांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
2017 मध्ये, जेव्हा योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी देखील या दोघांनाही भाजपकडून आमंत्रित केलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, अखिलेश यादव यांनी आपण या सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
विरोधक उपस्थित राहणार?
योगींच्या शपथविधी सोहळ्याबाबत अखिलेश म्हणाले, 'मला निमंत्रण मिळणार नसल्याने मी कार्यक्रमाला जाणार नाही, आणि निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही. तर मुलायमसिंह यादव हे देखिल या सोहळ्यापासून दूर राहू शकतात.
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, मंगळवारीच त्यांनी मुलायमसिंह यादव यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. यामध्ये सपा संरक्षकांना लक्ष्य करत 2017 च्या शपथविधी सोहळ्याचाही उल्लेख केला आहे.
यूपीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगींच्या शपथविधी सोहळ्यासाठी आतापर्यंत कोणतंही निमंत्रण आलेले नाही. निमंत्रण आलं तरी पक्षाचा कोणताही नेता कार्यक्रमाला येण्याची शक्यता फारच कमी आहे.
भव्य शपथविधी सोहळा
25 मार्च रोजी होणाऱ्या शपथविधीच्या दिवशी उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्हा, शहर, तहसील आणि गावातील मंदिरांमध्ये घंटा वाजवल्या जातील. लोककल्याणासाठी आरती आणि पूजा करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर उत्तर प्रदेशातील सर्व मठ आणि मंदिरांमधून साधु-संतांना शपथविधीसाठी लखनऊला येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
लखनौला येणार्या प्रत्येक कार्यकर्त्याने वाहनावर झेंडे घेऊन यावं, अशा सूचनाही पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्ष हा शपथविधी सोहळा भव्य आणि ऐतिहासिक व्हावा यासाठी जोरदार तयारी करत आहे.