प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या कोकण आवृत्तीत नाणारच्या समर्थनाथ जाहीरात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकेकाळी नाणारच्या समर्थनार्थ सर्व दैनिकात जाहीराती येत असताना केवळ सामनामध्ये त्याच्या विरोधात जाहीराती येत होत्या. पण आता नाणार प्रकरण संपल्यानंतर सामनातील जाहीरातीने आश्चर्य वाटल्याची प्रतिक्रिया स्थानिक देत आहेत.
सामनामध्ये नाणारच्या विरोधात लिखाण झाले होते. पण रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल समृद्धीकडे अशा मथळ्याखाली आज जाहीरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकार आल्यानंतर शिवसेनेची भूमिका बदलली का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नाणारचा विषय संपला आहे. हा विषय पुन्हा काढायचा देखील नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. आज कोणत्याही दैनिकात ही जाहीरात नसताना सामनामध्ये ही जाहीरात आल्याने अध्यक्ष नाणार संघर्ष समिती अशोक वालम यांनी 'झी २४ तास'ला सांगितले. आम्ही कोअर कमिटीची बैठक घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊ असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला शब्द दिलाय त्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे या जाहीरातीबद्दल त्यांना माहीती नसावी. आम्ही त्यांच्या हे निदर्शनास आणून देऊ असेही वालम म्हणाले.
इतर जाहीरांतासारखीच ही जाहीरात असल्याचे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी म्हणत यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. रिफायनरी ज्या जाहीराती देतात ते स्वत:च्या मनातील मांडे खात असतील. पण सरकारने हा विषय सोडला असल्याचे राऊत म्हणाले.