Diwali Special Recipe: दिवाळी म्हटली की फराळ हा आलाच. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवा दारी लागताच फराळाच्या कामाला वेग येतो. घराघरांत फराळाचा घमघमाट येऊ लागतो. पण हल्ली फराळ म्हटला की, चकली, शंकरपाळी, लाडु, अनारसे, तिखट शेव, चिवडा आणि करंजी या पदार्थांपुरताच मर्यादित राहिला आहे. मात्र आपल्या आजी-पणजीच्या काळात दिवाळीत अनेक पदार्थ बनवले जायचे. अशाच एका पदार्थाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
दिवाळीत तुम्ही करंजीतर खाल्लीच असेल. पुड्याच्या करंज्या, ओल्या नारळाच्या करंज्या असे अनेक प्रकार आहेत. मात्र, करंजीसारखाच दिसणारा आणखी एक पदार्थ आहे तो म्हणजे कान्होले. कान्होले या पदार्थाचा उल्लेख संत गजानन महाराजांच्या पोथीतही आढळतो. खासकरुन विदर्भात हा पदार्थ जास्त केला जातो. मात्र आता काळाच्या ओघात हा पदार्थ विस्मरणात गेला आहे. सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी या पदार्थाची रेसिपी शेअर केली आहे. जाणून घेऊया याची कृती आणि रेसिपी.
रवा, दूध, मीठ, गव्हाची पीठी, पीठीसाखर, कणिक, तूप-तेल, वेलची पूड
सर्वप्रथम रवा दुधात किंवा पाण्यात भिजवून घ्या. रवा भिजवताना त्यात चिमुटभर मीठ टाका. दोन वाटी रवा असेल तर त्यात अर्धी वाटी कणिक घ्यावी. नंतर रवा चांगला भिजवून अर्धा तास मुरत ठेवावा. आता एका भांड्यात तूप घेवून त्यात गव्हाची पिठी टाकुन चांगले भाजून घ्या. खरपूस भाजून घेतल्यानंतर त्यात साखरेची पिठी घालून चांगले एकजीव करुन घ्या. नंतर त्यात वेलची पावडर घालून एकत्र करुन घ्या.
रवा चांगला मळून घ्या थोडे तेल घालून नरम मळून घ्या. आता कोन्होल्यांसाठी पाऱ्या लाटायला घ्या. छोटे गोळे करुन घ्या. नंतर लाटण्याच्या सहाय्याने छोटी पोळी लाटून घ्या. लक्षात घ्या की पोळी की गोल नसून अंडाकृती लाटून घ्या, नंतर समोस्यासारखा आकार देऊन त्यात सारण भरुन घ्या आणि त्रिकोणी आकार येईल असे कान्होले तयार करुन घ्या.
कान्होले तुम्ही तेलात किंवा तुपातदेखील तळू शकता. मंद आचेवर कान्होल्या तळुन घ्या. कान्होल्यांना बदामी रंग आला की चांगलं तळून झालंय असं समजावं. कान्होल्यांची ही रेसिपी खासकरुन विदर्भात केला जातो. तसंच, संत गजानन महाराजांच्या पोथीतही याचा उल्लेख आढळतो.
टीप- कान्होल्या तुम्हाला लगेचच खायच्या असतील तर तुम्ही तुपातही तळू शकतात. मात्र, चार दिवस तुम्हाला टिकवायच्या असतील तर शक्यतो तेलात तळा. कारण तूप थंड झाल्यानंतर त्याचा एक मुलामा पदार्थावर राहतो. काहींना तो आवडतदेखील नाही. त्यामुळं तेलात तळणे कधीही चांगले.