चवीलाच नाही तर, आरोग्यासाठीसुद्धा गुणकारी असतो गरम मसाला; 'हे' 3 मोठे दुष्परिणामही वाचाच

गरम मसाला हा भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरला जाणारा मसाला आहे. हे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घालणयाआधी याचे गुणकारी फायदे तसेच दुष्परिणाम जाणून घ्या.

Updated: Feb 4, 2025, 02:02 PM IST
चवीलाच नाही तर, आरोग्यासाठीसुद्धा गुणकारी असतो गरम मसाला; 'हे' 3 मोठे दुष्परिणामही वाचाच title=

Garam Masala: भारतीय स्वयंपाकघरात गरम मसाल्याचा वापर चव वाढवण्यासाठी केला जातो. रस भाजी किंवा आमटी बनवताना गरम मसाल्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हा मसाला शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या जेवणात वापरला जातो. फक्त थोडासा गरम मसाला घालून कोणत्याही जेवणाची चव वाढवता येते. गरम मसाल्यामध्ये दालचिनी, लवंग, वेलदोडा आणि काळी मिरी यांचे मिश्रण असते.

गरम मसाला खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. गरम मसाला हा आपल्या जेवणात चव वाढवतो तसेच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. मात्र गरम मसाल्याचा वापर प्रमाणात करणे अत्यंत आवश्यक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? जास्त प्रमाणात गरम मसाला खाल्ल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे गरम मसाल्याचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

गरम मसाला खाण्याचे आरोग्यदायी फायदे

1. सर्दी-खोकल्यावर उपाय

हिवाळ्याच्या दिवसात सर्दी-खोकला होणे सामान्य आहे. गरम मसाल्यात असलेली लवंग, काळी मिरी आणि दालचिनी यांचे गुणधर्म गरम असते. गरम मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने वारंवार होणारी सर्दी-खोकला दूर करता येतो. या मसाल्यांचे औषधी गुण सर्दी-खोकल्यावर अत्यंत प्रभावी असतात.

2. पचनक्रिया

हिवाळ्यात भजी, पापड आणि भटुरे यासारख्या तळलेल्या पदार्थांची मागणी वाढते, पण हे पदार्थ पचनास त्रास देऊ शकतात. अशावेळी अन्नात गरम मसाला घालून खाल्ल्यास पचन तंत्र सुधारते. दालचिनी आणि इतर मसाल्यांमध्ये असलेले फायबर पचनक्रियेला मदत करते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

3. मधुमेह

मधुमेह सध्या खूप मोठी समस्या बनली आहे. मग अशा वेळी गरम मसाल्यात असलेली दालचिनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी गरम मसाल्याचा मर्यादित प्रमाणात उपयोग फायदेशीर ठरू शकतो.

4. सूज किंवा जखम

गरम मसाल्यात असलेल्या मसाल्यांमध्ये शरीराची सूज कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.

5. त्वचेसंबंधी समस्या

गरम मसाल्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. गरम मसाल्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने त्वचा निरोगी आणि तजेलदार राहते.

गरम मसाल्याचे दुष्परिणाम वाचाच

जसे गरम मसाल्याचे अनेक फायदे आहेत, तसेच त्याचे काही तोटेही आहेत. गरम मसाल्याचा जास्त वापर केल्यास काही गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.

1. अ‍ॅसिडिटी आणि जळजळ: अतिप्रमाणात गरम मसाला खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी, पोटात जळजळ आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते.

2. मुळव्याधाचा त्रास: जास्त मसालेदार अन्न खाण्यामुळे मुळव्याधाचा (पाइल्स) त्रास वाढू शकतो.

3. पचनामध्ये त्रास: कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर केली तर त्याचा त्रास हा होणारच, म्हणून गरम मसाला आवश्यक असेल किंवा गरज असेल तेव्हाच वापरावा. जास्त मसालेदार जेवण केल्याने पचनसंस्था बिघडू शकते आणि अपचन होण्याची शक्यता असते.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)