पुण्यात आढळून आले रहस्यमयी आजाराचे 22 रुग्ण! यंत्रणेला खडबडून जाग; आता महापालिकेने...

Rare Neurological Disorder Cases In Pune: पुण्यामध्ये या विचित्र आजाराचे रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 21, 2025, 10:57 AM IST
पुण्यात आढळून आले रहस्यमयी आजाराचे 22 रुग्ण! यंत्रणेला खडबडून जाग; आता महापालिकेने... title=
पुण्यात रहस्यमय आजाराचं थैमान (प्रातिनिधिक फोटो)

Rare Neurological Disorder Cases In Pune: पुण्यामध्ये एका रहस्यमयी आजाराचे रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आजाराचं नाव 'गुईवेल सिंड्रोम' (Guillain-Barré Syndrome) असं आहे. पुण्यात 'गुईवेल सिंड्रोम'चे 22 संशयित रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे म्हणजेच आयसीएमआरकडे या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, 'गुईवेल सिंड्रोम'संदर्भातील वेगळा कक्ष महापालिकेने स्थापन केला आहे.  

नेमका हा आजार आहे तरी काय?

'गुईवेल सिंड्रोम'संदर्भात 'एनआयव्ही' इंस्टिट्यूट म्हणजेच 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी'चा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहे त्या भागात महापालिकेकडून टीम नियुक्त केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 'गुईवेल सिंड्रोम' हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. म्हणजेच हा मज्जासंस्थेशीसंबंधित एक आजार असून तो एक लाखांमध्ये एका व्यक्तीमध्ये आढळून येतो. वेगळ्या पद्धतीच्या लसी घेतल्या असतील किंवा 'एच वन एन वन'च्या लस घेतली असेल तर काही प्रमाणात हा दुर्मिळ आजार लोकांना होऊ शकतो, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

6 रुग्ण पुणे शहरात तर 16 बाहेरील

'गुईवेल सिंड्रोम'चं निदान करण्यासाठी 'स्पाइनल फ्लूड'ची चाचणी केली जाते. 'गुईवेल सिंड्रोम'वरील उपचार हे महागडे असून यामध्ये उपाय म्हणून 'प्लाजमा एक्सचेंज'सारखी पद्धत वापरली जाते. हा आजार दुर्मिळ असला तरीही धोकादायक नाही. सध्या पुण्यात आढळून आलेल्या रुग्णांपैकी पुणे शहरात एकणू 6 रुग्ण आहेत. तर उर्वरित 16 रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील इतर वेगवेगळ्या भागांमधील आहेत. यासंदर्भातील माहिती आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी दिली आहे.

हा आजार संसर्गजन्य आहे का?

पुण्यात आढळून आलेले 6 रुग्ण उपचारासाठी पुण्यात आलेले होते. त्यामुळे सर्वच रुग्ण हे पुणे शहराच्या बाहेरील आहेत, असं स्पष्ट होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा आजार संसर्गजन्य नसल्याने त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता फारच कमी आहे. सध्या पुण्यामधील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये या रुग्णांची तपासणी केली जात आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये 'गुईवेल सिंड्रोम'चे हे रुग्ण होते त्या परिसरातही रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.