कन्येची पहिली मासिक पाळी नाशिक मध्ये उत्साहात सार्वजनिकपणे साजरी

समाजातील संकुचित दृष्टिकोन  चांदगुडे परिवाराने केला दूर  

Updated: Aug 4, 2022, 06:39 PM IST
कन्येची पहिली मासिक पाळी नाशिक मध्ये उत्साहात सार्वजनिकपणे साजरी
यशदा हिचा पहिला मासिक धर्म साजरा करताना

सोनू भिडे, नाशिक- समाजात मासिक पाळी या विषयावर संकोचाने बोलले जाते. त्यावर कधी चर्चा होत नाही. त्याबाबत बऱ्याच अंधश्रद्धा व गैरसमजुती समाजात आहेत. एखाद्या घरातील लेकीला मासिक पाळी सुरू होणे म्हणजे पारंपरिक समजुती व पुर्वग्रहामुळे तिच्या मनात अपराधी पणाचा भाव निर्माण होतो. पण या सर्वाना छेद देण्याचे काम आज नाशिकमध्ये करण्यात आले आहे. 

यशदा चा पहिला मासिक धर्म उत्साहात साजरा 
यशदा नाशिक मधील अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांची कन्या..... तीला प्रथम मासिक धर्म प्राप्त झाला. हा प्रथम मासिक धर्म नाशिकमध्ये आज (४ ऑगस्ट) उत्साहात सार्वजनिकपणे  साजरा करण्यात आला. यावेळी  'आता माझी पाळी, मीच देते टाळी' हे घोषवाक्य घेऊन अभियान सुरु करण्यात आले. आपल्या लेकीचा सन्मान व्हावा, तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ नये, समाजाचा मासिक पाळीबाबतचा दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी चांदगुडे  दांपत्यांनी मासिक पाळी महोत्सवाचे आयोजन केले होते. 

या कार्यक्रमाला महिला आणि पुरुषांना बोलावण्यात आले होते. नागरिकांचा या विषयाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक व्हावा यासाठी या महोत्सवात “कोष” हा लघुपट दाखवला गेला. मासिक पाळी या विषयावर संदेश देणारी गाणी व कविता यावेळी म्हटल्या गेली. संत वाड्मयातील रचनांमध्ये सापडणाऱ्या अभंगांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. महिला आणि पुरुषांची मासिक पाळी या विषयावर चर्चासत्र झाले. कार्यक्रमानंतर यशदानेच उपस्थितांना पाणी आणि भोजन दिले. या उपक्रमाची राज्यभर चर्चा होत आहे.

कृष्णा चांदगुडे यांनी व्यक्त केली भावना
"समाजात मासिक पाळी संदर्भात खुपच गैरसमजती,अंधश्रद्धा आहेत. अंनिस मध्ये काम करतांना त्याबाबत आम्ही प्रबोधन करत असतो. आज आमच्या मुलीला प्रथमच मासिक पाळी आल्यानंतर प्रबोधनासोबत प्रत्यक्ष कृतीची जोड देण्याची गरज होती.म्हणून प्रथम मासिक पाळीचे नियोजन आम्ही केले. त्यातुन लोकांना सकारात्मक दृष्टिकोन मिळाला" असल्याची भावना यशदाचे वडील कृष्णा चांदगुडे यांनी व्यक्त केली.