मुंबई : राज्यात आता ठाकरे आणि शिंदे गटाचा संघर्ष आता थेट शाखा (Shivsena Shakha) ताब्यात घेण्यापर्यंत पोहचला आहे. रत्नागिरीपाठोपाठ आता ठाण्यातही ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले आहेत. दापोलीत शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. ठाकरे गटाकडून रामदास कदमांविरोधात घोषणाबाजी देखील झाली. शिंदे समर्थक अचानक आंदोलना ठिकाणी पोहोचले आणि शिवसेना शाखा ताब्यात घेण्याचा शिंदे गटाने प्रयत्न केला. (Shinde group vs Thackeray Group)
दुसरीकडे ठाण्यातील मानोरमा नगर इथे शिवसेनेच्या शाखेवरून शिंदे गट व उद्धव ठाकरे गट आमने सामने आले. शिंदे गटातील शाखाप्रमुख शाखेत बसले असताना ठाण्यातील राजन विचारे गटातील काही पुरुष आणि महिला पदाधिकाऱ्यांनी शाखेत येऊन शाखेवर दावा केला. याच शाखेत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नवीन फोटो देखील लावण्यात आले.
पोलिसांच्या दक्षतेमूळे संपूर्ण प्रकार आटोक्यात आला. त्यानंतर पुन्हा दोन्ही गट आमने-सामने येऊन घोषणाबाजी करत होते. दोन्ही गटाची समजूत घालून पदाधिकाऱ्यांना परत पाठवण्यात आले. तर पोलिसांनी शाखेला कुलूप लावले. शाखेवरून झालेल्या या वादामुळे परिसरला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट आधीच आमने-सामने आहेत. शिवसैनिक आता शिवतिर्थासाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या शिष्टमंडळानं जी/नॉर्थ पालिका वॉर्ड ऑफिसवर आज धडक दिली. वॉर्ड ऑफिसर प्रशांत सपकाळेंची भेट घेऊन शिवसैनिकांना त्यांना जाब विचारला. महिना उलटला तरी शिवसेनेला परवानगी मिळत नाही. विधी खात्यानं अद्याप निर्णय दिलेला नाही. सरकारची दडपशाही सुरू असल्याचा आरोप वैद्य यांनी यावेळी केला. परवानगी मिळाली नाही तरी शिवाजी पार्कवरच ठाकरे गटाचा मेळावा होणार, असा दावाही त्यांनी केला.