नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीनंतर चौकीदाराची चौकशी होईल आणि तो तुरुंगात जाईल, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. ते गुरुवारी नागपूरमधील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, तुम्ही गरीब किंवा कष्टकऱ्यांच्या घराबाहेर चौकीदार उभा राहिल्याचे कधी पाहिले आहे का? मात्र, अनिल अंबानी यांच्या घराबाहेर हजारो चौकीदार उभे आहेत. आपल्याकडून जे काही चोरले आहे, त्याची राखण हे चौकीदार करत आहेत. देशातील जनता 'अच्छे दिन' येईल, याची वाट बघत बसले. मात्र, थोड्या दिवसांनी 'चौकीदार चोर है' चे नारे कानावर पडायला लागले. चौकीदाराने केलेला घोटाळा हा काही लहानसहान नाही. लोकसभा निवडणुकीनंतर या सगळ्याची चौकशी होईल, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
#WATCH: Congress President Rahul Gandhi says in Nagpur, Maharashtra, "after elections, there will be an inquiry, the 'chowkidaar' will go to jail". (04.04.19) pic.twitter.com/MWDDma4m57
— ANI (@ANI) April 5, 2019
यावेळी त्यांनी राफेल, कर्जमाफी, नोटाबंदी यावरून पंतप्रधान मोदी आणि भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेसची गरीबांसाठीची ७२ हजार ही योजना अर्थतज्ज्ञांशी चर्चा करूनच जाहीर करण्यात आल्याचे सांगताना हा गरीबीवरील काँग्रेसचा सर्जिकल स्ट्राईक असल्याचे त्यांनी म्हटले. चीनच्या बाजारपेठेत 'मेड इन विदर्भ'चा टॅग असलेल्या वस्तू असाव्यात आणि विदर्भाला सिंगापूर, दुबईसारखे उत्पादन केंद्र करायला पाहिजे होते. मात्र, भाजपने यापैकी काहीच न केल्याची टीका राहुल यांनी केली.