मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील निलेश दुर्गे या ३३ वर्षीय युवकाचा 'माणूसकीचा चहा स्पॉट' हा एक अभिनव स्पॉट म्हणून सध्या चर्चेत आहे. निलेश दुर्गे याने 7 वर्षे फोटोग्राफीचा व्यवसाय केला आणि त्यानंतर त्याने चहा व्यवसायात पाऊल टाकले.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, गरिब ते श्रीमंतांपर्यंत सगळेच चहाचे शोकीन आहेत. काहींना तर चहाचे व्यसन जडल्याचे पाहायला मिळतं. अलीकडच्या काळात काचेचे, चिनी मातीचे कप मिळणं कठीण झालंय. सगळीकडे आलेत ते प्लास्टिक कप. मात्र, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत.
या सर्व बाबींचा विचार करता या पठ्ठ्याने चांगलीच शक्कल लढवली आहे. स्पर्धेच्या युगात टिकून आपला चहाचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्याने जी शक्कल लढवली त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
शहरात गुळाच्या चहा०सह वेगवेगळ्या चवीची चहाची दुकाने आहेत. मग आपण यापासून वेगळे काही तरी केले पाहिजे तरच ग्राहक पसंती देतील या हेतूने त्याने काचेच्या, मातीच्या किंवा प्लास्टिकच्या कपाचा वापर न करता बिस्किट, मैदासारख्या पदार्थापासून तयार केलेल्या कपात चहा विकायला सुरुवात केली.
जसे कोनमधील आईस्क्रीम खाऊन झाले की कोनही खाता येतो. त्याचपद्धतीने चहा पिऊन झाला की रिकामी कप गट्टम स्वाहा करता येतो. बुलडाणा जिल्ह्यातील त्याने केलेला हा अभिनव प्रयोग आहे. यात प्रयोगात तो यशस्वीही झाला आहे.