कोल्हापूर - महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४४ जागा वाटपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत होऊन निर्णय झाला आहे. उरलेल्या जागावाटपाचा निर्णयही लवकरच होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेनिमित्त अजित पवार सोमवारी कोल्हापूरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल माहिती दिली.
ते म्हणाले, ४४ जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असून निर्णय झाला आहे. आता उर्वरित चार जागांचा निर्णय झाला की दोन्ही पक्ष एकत्रितपणे जागावाटपाची माहिती देतील आणि आघाडीची औपचारिक घोषणाही होईल. आघाडीमध्ये कोल्हापूरप्रमाणे साताऱ्याच्या जागेबाबतही काहीशी धुसफूस होती. मात्र, तिथेही आता मनोमिलन झाले आहे. काही लोकांची मागणीच जास्त असल्यामुळे जागा वाटपाचा विषय प्रलंबित राहतो. पण लवकरच त्यावर तोडगा काढला जाईल. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मागितलेल्या १२ जागांच्या मागणीवरही सध्या चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चा करण्यासाठी गेल्या बऱ्याच दिवसांपासून सातत्याने बैठका होत आहेत. यापैकी काही बैठका दिल्लीतही पार पडल्या आहेत. या बैठकांनंतर आता दोन्ही पक्षांनी ४४ जागांचा निर्णय अंतिम केला आहे. कोणता पक्ष कोणती जागा लढवणार हे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील राजकीय वातावरण ढवळून काढण्यास सुरुवात केली आहे.