पुणे : एसटी कर्मचाऱ्यांना (ST Strike) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अल्टिमेटम दिला आहे. 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा, ही शेवटची संधी असून, गैरहजर राहणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली असून पगार वेळेत दिला जाईल असं आश्वासनही अजित पवारांनी दिलं आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी सभागृहात काल याबाबत माहिती दिली. कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही अनिल परब यांनी दिली. वर्षाला 750 कोटींचा बोजा सरकारवर पडणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत दिले जाणार असून त्याची जबाबादारी राज्य सरकारने घेतली आहे.
त्यामुळे ३१ मार्चपर्यंत कर्मचारी कामावर आले नाहीत तर त्यांच्याबाबत कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी गेले तीन महिने एसटी कर्मचारी संपावर आहेत. न्यायालयाच्या आदेशाने नेमण्यात आलेल्या समितीनेही विलीनीकरणाची माणी व्यवहार्य नसल्याचं सांगितलं आहे.