Akshay Shinde Encounter CM Eknath Shinde Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा बळी ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेशीसंबंधित भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना वाचवण्यासाठी पुरावा नष्ट करण्यासाठी घेतल्याचा आरोप राऊतांनी केला. तसेच कोण सिंघम यावरुन फडणवीस आणि शिंदेंमध्ये वाद सुरु असल्याचं सांगत राऊतांनी खोचक शब्दांमध्ये टोलेबाजी केली.
"हायकोर्टाने काल सरकारला हा प्रश्न विचारला आहे की याला एन्काऊंटरला खरं कसं म्हणायचं? प्रश्न खरं किंवा खोट्याचा नाही तर बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्ट यासारख्या गोष्टींमध्ये असे खटले अडकून राहता कामा नये. झटपट न्याय झाला पाहिजे. मात्र राजकीय स्वार्थासाठी एन्काऊन्टर करत असाल तर हे चुकीचं आहे. तुम्ही स्वत:ला सिंघम मानता. सिंघम कोण म्हणून त्या दोघांमध्ये (एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस) वाद सुरु आहे. देशात मी पहिल्यांदा बघतोय की देशात वाद सुरु आहे सिंघम कोण यावरुन! एका राज्यातील दोन नेते ज्यात एक मुख्यमंत्री आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते दोघे एन्काऊन्टरचं श्रेय घेण्यावरुन भांडत आहेत. मी सिंघम की तू सिंघम असा वाद सुरु आहे. या वादावरुनच समजतं की किती मोठं राजकारण सुरु आहे," असं राऊत म्हणाले.
"फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघात एका वर्षात 100 हून महिलांची हत्या, बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झालेत. फडणवीसांनी किती जणांचा एन्काऊन्टर केला? कालच नालासोपारामध्ये भाजपाचा एक पदाधिकाऱ्याला समुहिक बलात्कार प्रकरणात अटक केली आहे. सिंघम देवेंद्र फडणवीस आणि सिंघम एकनाथ शिंदे त्या भाजपा पदाधिकाऱ्याचा एन्काऊन्टर करणार? एकच एन्काऊन्टर का? ज्याने ज्याने महिलांवर अत्याचार केले आहेत त्या सर्वांचे एन्काऊन्टर करा. आम्ही करु तुमचं समर्थन," असं राऊत म्हणाले.
"सिंघम हा चित्रपट काल्पनिक कथा आहे पडद्यावरील. मी तो चित्रपट पाहिला आहे. पडद्यावरील कथा प्रत्यक्ष जिवनात घडत नाही. फडणवीसांच्या हातात बंदूक दाखवून फोटो आहे, मी सिंघम असा दावा केलाय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या हातात एके-47 दाखवण्यात आली आहे. त्यांनाही सिंघम म्हटलं आहे. सिंघम पदासाठी दोघांमध्ये संघर्ष सुरु आहे. जणू काही त्यांनी भारताच्या सीमेवर जाऊन त्यांनी शौर्य गाजवलं आहे," असा टोला राऊतांनी लगावला.
संजय राऊत यांनी सिंघम कोण हे कसं ठरवायचं याबद्दल उपहासात्कम सल्ला दिला आहे. "ही हत्याच आहे हे हायकोर्ट म्हणतंय. त्यांनी अनेक प्रश्न विचारलेत. त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल मिस्टर सिंघम! आधी तुमच्यात सिंघम कोण हे ठरवा. मिस्टर शिंदे सिंघम आहेत की फडणवीस सिंघम आहे. या देशातील कायदा आणि संविधान सिंघमने लिहिलेलं नाही. त्यांनी कॅबिनेट बोलवून ठरवावं की आमच्या सरकारमध्ये सिंघम कोण," असा उपाहात्मक टोला राऊत यांनी लगावला.