मुंबई : लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनासाठी दिलेले आमंत्रण आणि त्यानंतर रद्द केलेले आमंत्रण यावरुन सध्या प्रचंड वाद सुरू आहे. या वादानंतर अनेक साहित्यिकांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार घातला आहे. काय आहे हा सगळा वाद? काय आहे यावर साहित्यिकांची आणि राज्य सरकारची भूमिका? एक रिपोर्ट. सहगल या इंग्रजीतून लिखाण करणाऱ्या लेखिका आहेत. त्यामुळे त्यांना विरोध होत होता. नयनतारा संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात देशातील सध्यपरिस्थितीवर, असहिष्णू वृत्तीवर भाष्य करतील, असा अंदाज आधीच बांधण्यात आला. त्यामुळे नवा वाद नको म्हणून त्यांना उपस्थित न राहण्याचे सांगण्यात आले. मात्र, हे करत असताना नवा वाद साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुढे आला आहे.
११ ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय साहित्य संमेलनाचे उदघाटन प्रख्यात साहित्यिक नयनतारा सहगल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. मात्र इंग्रजी लेखन करणाऱ्या नयनतारा सहगल मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक कशा ? असा प्रश्न काही राजकीय पक्ष आणि काही संघटनांनी उपस्थित केला. त्यानंतर अचानक आयोजकांना नयनतारा यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्याची नामुष्की ओढवली. संमेलनातली व्यवस्था विस्कळीत होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. मात्र, यात राजकारण होत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, जर असे होते ते आधी कळले नाही का, आधी निमंत्रण द्यायचे आणि नंतर ते रद्द करायचे, हा खेळ कशासाठी असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
साहित्य संमेलन आणि वादाची परंपरा ही तशी नवीन नाही. मात्र, साहित्य संमेलनाच्या या वादात राज्य सरकारला गोवू नका, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही, याचा सर्वस्वी निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकच घेत असतात. त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते. असे मुख्यमंत्री सचिवालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, संयोजकांमार्फत नयनतारा यांना येऊ नसे असे सांगण्यात आल्याने नयनतारा अखेर साहित्य संमेलनाला येणार नाहीत. मात्र, मग दिलेले निमंत्रण रद्दच करायचे होते मग बोलवायचेच कशाला, हा प्रश्न अनुत्तरित ठेवून आयोजकांनी साहित्य संमेलन आणि वादाची परंपरा कायम ठेवली असल्याचे दिसून येत आहे.