धक्कादायक! सीलबंद औषधांमध्ये सापडल्या मुंग्या

या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Updated: Jul 10, 2019, 08:23 PM IST
धक्कादायक! सीलबंद औषधांमध्ये सापडल्या मुंग्या title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळच्या मारेगाव ग्रामीण रुग्णालयातील सीलबंद औषधामध्ये दुर्गंधी तसेच मुंग्या आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. एका बालिकेला हे औषध दिल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

शहरातील कृष्णा तुरणकार यांच्या चार वर्षीय गुंजन या मुलीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले होते. यावेळी तिची तपासणी करून 'सिट्रीज-पी सायरप' औषधाची बॉटल देण्यात आली. मुलीला औषध पाजण्यासाठी सीलबंद बॉटल फोडून झाकणामध्ये औषध टाकले असता त्यातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. औषधात मुंग्या देखील आढळल्या. दरम्यान तुरणकार यांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. 

'सिट्रीज-पी सायरप' ७ वर्षापर्यंतच्या मुलांना सर्दी व ॲलर्जी या आजारासाठी देण्यात येते. मात्र, शासकीय दवाखान्यातील औषध खराब निघाल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली. खराब औषधांमुळे रुग्णाच्या जीवाल धोका होऊ शकतो. त्यामुळे अशी औषधे ठेवणाऱ्या आणि ती रुग्णाला देणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान वैद्यकीय अधिक्षकांनी या औषधांचे वाटप थांबविले असून औषधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्याचे सांगितले.