मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या विरोधात कार्यकर्त्यांतील खदखद रस्त्यावर

बंडाचा झेंडा फडकावणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने हेदेखील सहभागी झाले होते

Updated: Oct 2, 2019, 04:45 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या विरोधात कार्यकर्त्यांतील खदखद रस्त्यावर  title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : विधानसभा निवडणूक २०१९ दरम्यान लातूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण लढतीपैंकी एक असलेल्या औसा विधानसभा मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत खदखद रस्त्यावर आली आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. यानंतर लगेचच पक्षांतर्गत बंडाळी उघड झाली आहे. मंगळवारी भाजपाकडून आपल्या १२५ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली... यातील अभिमन्यू पवार हे नाव सगळ्यात जास्त चर्चेत राहिलं.

उमेदवार बदलण्याची मागणी

बंडाचा झेंडा फडकावणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने हेदेखील सहभागी झाले होते. भूमीपुत्राचा मुद्दा घेऊन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचे धाकटे बंधू अरविंद पाटील-निलंगेकर, शिवसेना माजी आमदार दिनकर माने, जिल्हा परिषद सभापती बजरंग जाधव, स्थानिक भाजप नेते किरण उटगे यांच्यासहित भाजपचे अनेक कार्यकर्ते औसा शहरात रस्त्यावर उतरले होते. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर आक्रमक झालेल्या भाजप-सेना कार्यकर्त्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा ताफाही औसा टी पॉईंट येथे अडविला. यावेळी आंदोलकांनी पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांना निवेदन देऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली.


विरोधक रस्त्यावर 

मतदारसंघातील भूमीपुत्र असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देऊन उमेदवारी देण्याची मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली. तर पालकमंत्री यांनीही कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी भाजप कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या. त्यानंतर एकत्र बैठक घेऊन भाजप-शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ज्यामुळे लातूर-हैद्राबाद, लातूर तुळजापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

अधिक वाचा :- भाजपाकडून औसामधून पवारांना संधी, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न

 

 

सेनेच्या हातातून 'औसा' सुटल्याची खंत...

मुळात औसा हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेचा करून त्यांचे ओएसडी अर्थात स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्यासाठी सोडवून घेतला. पवार हे स्वrय सहायक होण्यापूर्वी भाजपाचे लातूर जिल्ह्यातील कार्यकर्ते होते. औसा मतदारसंघात निलंगा तालुक्यातील ६८ गावे येत असल्यामुळे पालकमंत्री यांचे धाकटे बंधू अरविंद पाटील-निलंगेकर यांच्यासहीत इतरांनीही उमेदवारी मागितली होती. मात्र आता औसा ही जागा शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू पवार यांच्यासाठी सोडवून घेतल्यानंतर त्याला विरोध होऊ लागला आहे. यावर पक्षश्रेष्टीच योग्य निर्णय घेतील असे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केलंय.