कोल्हापूर : शिवसेना - भाजप युतीसंदर्भात बोलणी अंतिम टप्प्यात आली असून लवकरच त्याबाबत घोषणा करणार असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी मात्र त्यांनी ज्येष्ठ नारायण राणे यांच्याबाबत बोलणे टाळले. मित्रपक्षाला विचारात घेऊन राणेंबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच निवडणूक लढवण्यास पक्षाला सांगितल्यास विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंधरा वर्ष राज्य करण्याची संधी मिळून सुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारता न आल्याचे शल्य तर विरोधकांच्या मनात आहेच. पण, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळणे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागल्यासारखे दिसते आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मुळात अभ्यास न करता पत्रपरिषदा घेणे, यापलिकडे कोणताही धंदा सचिन सावंत यांनी केला नाही आणि नवाब मलिक यांना तर शिवस्मारकाचे कधीच अप्रुप नव्हते, त्यामुळेच पोकळ आरोप ते करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मार्च 2018 मध्ये या विषयावर सविस्तर निवेदन राज्याच्या विधानसभेत केले होते, असे ते म्हणालेत.