उमेदवारी न मिळाल्याने गणेश नाईक नाराज, नगरसेवकांची बोलावली बैठक

Updated: Oct 2, 2019, 12:09 PM IST

ठाणे : गणेश नाईकांना उमेदवारी न दिल्याने नाईक कुटुंब नाराज आहे. या पार्श्वभुमीवर गणेश नाईकांनी महापालिका नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. 12:30 वा. महापौर बंगल्यावर ही बैठक होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशा 56 नगरसेवकांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीला संदीप आणि संजीव नाईक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नाराज गणेश नाईक आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गणेश नाईक यांनी नवी मुंबई येथे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ४८ नगरसेवकांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. १५ वर्षे गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. शहरी आणि ग्रामीण भागात गणेश नाईक यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. 

भाजपच्या गोटात दाखल होऊन काही दिवस उलटत नाही तोच गणेश नाईक यांना उपेक्षित वागणुकीला सामोरे जावे लागले होते. भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर जागा न मिळाल्यामुळे गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक कार्यक्रमातून आल्या पावली माघारी परतले होते.