अरुण मेहेत्रे / पुणे : Raj Thackeray's sabha in Pune : मनसेच्या पुण्यातील ' राज' सभेचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 21 मेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा मुठा नदीपात्रात होणार आहे. अर्थात परवानगीची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर स्थळ पुराण सुरु राहणार हा भाग निराळा...मुळात राज ठाकरे यांनी पुण्यात वाढवलेले लक्ष आणि होऊ घातलेली जाहीर सभा यातून काय साधलं जाणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे.
मनसेच्या रिलॉन्चनंतर रेल्वे इंजिनाला गती देण्याचा राज यांचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून यंदाचा पाडवा मेळावा, त्यांनतर ठाणे, औरंगाबाद या ठिकाणी एकापाठोपाठ झालेल्या सभा, या सभांमधून दिला गेलेला भोंगे हटावचा नारा, अयोध्या दौऱ्याची घोषणा या सगळ्या घडामोडींकडे पहावे लागेल. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यात काय घडतंय याला महत्त्व प्राप्त होते.
पक्ष संघटना मजबूत करणे, पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवणे आणि या दोन्ही गोष्टी साध्य करत असताना सत्तेच्या सारीपाटावर स्वतःचे त्याचप्रमाणे पक्षाचे स्थान बळकट करणे असा कार्यक्रम राज ठाकरे यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रश्नच नाही. पुढच्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, विशेष करून महापालिकांच्या निवडणुका हे त्यांचं प्रमुख लक्ष्य आहे.
पुण्यामध्ये कधीकाळी मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते, एक आमदार निवडून आला होता. आजघडीला आमदार सोडा, शहरातील एकूण नगरसेवकांची संख्या अवघी 2 इतकी आहे. अशी परिस्थिती असताना पक्षाचे भवितव्य काय हा प्रश्न स्थानिक नेते आणि कार्यकर्ते दोघांनाही पडला आहे. त्यातच भाजपसोबत युती होणार का नाही यावर बरेच काही अवलंबून आहे.
युतीचा विषय तूर्तास बाजूला ठेवून 2 मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. एक म्हणजे राज यांचा पुणे दौरा आणि दुसरा म्हणजे पक्षांतर्गत सुंदीपसुंदी.अलीकडच्या काळात राज यांनी पुण्यात विशेष लक्ष घातले आहे. त्यांचे दौरे अनपेक्षितपणे वाढले आहेत. अनपेक्षितपणे यासाठी की पूर्वी असं फार क्वचित घडायचं! पुण्याचे राजकीय महत्त्व आणि पक्ष संघटनेची गरज ही त्या मागची प्रमुख कारणे आहेत.
मुंबईतील पाडवा मेळावा झाल्यानंतर त्यांच्या भाषणाचे पडसाद पुण्यामध्ये प्रकर्षाने उमटले. मशिदीवरील भोंगे काढण्यावरून मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. इतकच नाही तर मनसेचे शहर प्रमुख वसंत मोरे यांनीदेखील आदेश पाळण्यास असमर्थता दर्शवली. त्याचा परिणाम म्हणून वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. महत्वाचे म्हणजे हे एवढ्यावरच थांबले नाही. शहर मनसे मधील धुसफूस पुन्हा एकदा उफाळून आली. वसंत मोरे एका बाजूला आणि उर्वरित नेते दुसऱ्या बाजूला अशी आजची स्थिती आहे. आपल्याला पक्षात असून डावलले जात असल्याची मोरे यांची तक्रार आहे. पक्षातील सामान्य कार्यकर्ते संभ्रमित आहेत तर नेतेदेखील जणू दिशाहीन बनले आहेत.
गंमत अशी की हे सगळे घडत असताना वसंत मोरे अनाठाई प्रसिद्धी खात आहेत. राज ठाकरें पेक्षाही जास्त वेळा टीव्हीवर दिसणारा चेहरा म्हणून वसंत मोरे यांचा उल्लेख केल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे नेतृत्व या अर्थाने मर्यादा आहेत. या परिस्थितीकडे राज ठाकरेंच्या दौऱ्यांची गरज या दृष्टिकोनातून पाहता येईल.
राज ठाकरे आजही पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील सभेची तयारी, अयोध्या यात्रेची तयारी त्या जोडीनेच वसंत मोरे यांचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावणे हा दौऱ्याचा अजेंडा असू शकतो. तसे घडले तरच पुढचे मनसुबे बाळगता येणार आहेत.
ठाण्यातील सभेनंतर राज ठाकरे यांना पुण्यात आमंत्रित करण्यात आले. खालकर तालीम मारुती मंदिरात त्यांच्या हस्ते महाआरती झाली. याच औचीत्यावर त्यांचा सगळ्यात पहिल्यांदा हिंदू जननायक म्हणून उल्लेख झाला.
एकापाठोपाठ होत असलेल्या सभा आणि मनसेच्या कार्यक्रमांमुळे राज ठाकरे पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. सर्वच पक्षांना त्यांची दखल घ्यावी लागत आहे. पुढचा टप्पा म्हणून त्यांची पुण्यात सभा होणार आहे. सभा भव्य होणार यात शंका नाही. फक्त राज यांनी भाषणातून मांडलेला विचार पुणेकरांच्या कितपत पचनी पडणार याबद्दल साशंकता आहे. कारण पुढचं सगळं राजकारण त्यावरच अवलंबून असणार आहे.